नगर: अकोले पोलिसांकडून १४ लाख रुपयांचा गुटखा जप्त | पुढारी

नगर: अकोले पोलिसांकडून १४ लाख रुपयांचा गुटखा जप्त

अकोले, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील वाशेरे गावच्या शिवारात दत्तात्रय गजेच्या घरात सुमारे १४ लाख १४ हजार ६०० रुपयांचा बेकायदा गुटखा पकडत, वसिम हमीद तांबोळी (वय ३० रा. अकोले) याला पोलिसांनी गजाआड केले आहे. त्यामुळे गुटखामाफिया आणि दलाल पुन्हा सक्रिय झाल्याचे या कारवाईतून दिसून येत आहे.

अकोले परिसरात बेकायदा कुटख्याची विक्री होत असून वासरे परिसर गुटख्याचा केंद्रबिंदू असल्याची गोपणीय माहिती पोलिसांना मिळाली होती. उपविभागीय अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि.मिथुन घुगे यांनी वाशेरे येथील दत्तात्रय गजे यांच्या घरावर छापा टाकला असता त्यांना हिरा पान मसाला गुटखा असल्याचे निदर्शनास आले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने हा गुटखा बाहेरून आणल्याचे सागितले. हिरा नावाचा अमली गुटखा असलेल्या दोन पिकअप गाडीभर हा माल आहे.

एका गाडीत ७८ व दुसऱ्या गाडीत ७९ गोण्या अशा एकूण १५७ जप्त करण्यात आल्या. पोलिसांना एकूण १४ लाख १४ हजार ६०० रुपयांचा बेकायदा गुटखा पकडण्यात अकोले पोलिसांना यश आले आहे. याबाबत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासस.पो.नि.मिथुन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई भुषण हांडोरे हे करित आहे.

शहरात टपऱ्यांवर मिळतोय सर्रास गुटखा

अकोले शहरात व राजूर, कोतुळ, शेंडी, समशेरपुर, देवठाण, ब्राह्मणवाडा या ठिकाणी सर्रास गुटखाविक्री होत असल्याचे सध्या चित्र आहे. दोन वर्षांपूर्वी तांबोळीकडे मोठ्या प्रमाणात गुटखा पकडल्यानंतर गुटखा विक्रेत्यांनी धास्ती घेतली होती. परंतु अलीकडील काही माहिन्यात कारवाई मंदावल्याचे पाहायला मिळाल्यानंतर पुन्हा गुटखा दलाल आणि गुटखा विक्रेते सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत असल्याचे या कारवाईवरून स्पष्ट होत आहे.

Back to top button