दहशत बिबट्याची ! गेल्या दीड वर्षात 1300 जनावरांची शिकार ; 36 नागरिकांवर हल्ला | पुढारी

दहशत बिबट्याची ! गेल्या दीड वर्षात 1300 जनावरांची शिकार ; 36 नागरिकांवर हल्ला

दीपक आहोळ : 

नगर : गेल्या दीड वर्षात बिबट्यांच्या हल्ल्यात 1 व्यक्तीचा मृत्यू झाला असून, 36 जण गंभीर जखमी झाले आहेत. याच कालावधीत बिबट्यांने 1 हजार 337 जनावरांची शिकार केली. बिबट्याच्या हल्ल्यात दगावलेल्या व्यक्तींच्या वारसांना आता 20 लाख रुपये आर्थिक मदत मिळणार आहे. गेल्या दीड दशकांपासून शेतशिवारात बिबट्यांची दहशत वाढली आहे. बिबट्यांच्या भीतीमुळे शेतकरी धास्तावला असून, रात्री शेतीवर जाण्यास टाळाटाळ करु लागला आहे. बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे शेतीची कामे करताना शेतकर्‍यांनी काळजी घ्यावी. लहान मुलांची उंची व बिबट्याची उंची सारख्या प्रमाणत येत असल्याने बिबट्या भक्ष्य समजून मुलांवर हल्ला करण्याची शक्यता असते. त्यामुळे मुलांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे, असे आवाहन उपवनसंरक्षक सुवर्णा माने यांनी शेतकर्‍यांना केले आहे.

गेल्या काही वर्षांपासून बिबट्यांचे मनुष्यावरील हल्ले व पशुधन जखमींची संख्या वाढलेली आहे. जिल्ह्यातील राहुरी, कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, नेवासा य श्रीगोंदा या तालुक्यांत ऊस क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे बिबट वन्यप्राण्यांची संख्या देखील या तालुक्यांत जास्त आहे. बिबट्याच्या हल्ल्यात व्यक्ती किरकोळ जखमी झाल्यास उपचाराचा खर्च वनविभागाकडून उपलब्ध केला जात आहे. मात्र, गंभीर जखमी झाल्यास सव्वालाख रुपये अदा केले जात आहेत.

बिबट्यांच्या हल्ल्यात मनुष्य दगावल्यास त्यांच्या कुटुंबाला शासनाकडून तत्काळ 15 लाख रुपयांची आर्थिक मदत केली जात आहे. भाजप-शिवसेना (बाळासाहेबांची ) सरकारने गेल्या महिन्यात या रकमेत 5 लाखांची वाढ केली आहे. त्यामुळे आता 20 लाखांची आर्थिक मदत उपलब्ध होणार आहे.

गेल्या वर्षी 2021-22 या आर्थिक वर्षात राहुरी तालुक्यातील ताहाराबाद येथील वनमजूरावर बिबट्याने हल्ला केला होता. या हल्ल्यात वनमजूर दगावला आहे. त्यांच्या कुटुंबाला 15 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. यंदाच्या आर्थिक वर्षात एकही व्यक्ती बिबट्यांच्या हल्ल्यात मरण पावलेला नाही. बिबट्याने शेळी वा मेंढी फस्त केल्यास 10 हजार रुपये तर गाय, म्हैस दगावल्यास प्रत्येकी 70 हजार रुपये नुकसानभरपाई पशुपालकांना दिली जात असल्याचे उपवनसंरक्षक सुवर्णा माने यांनी सांगितले.

सहा महिन्यांत 12 व्यक्ती जखमी, 498 जनावरे फस्त 

यंदा एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांच्या कालावधीत बिबट्यांच्या हल्ल्यात 12 जण दगावले आहेत. जखमी व्यक्तींना 4 लाख 62 हजारांची आर्थिक मदत दिली आहे. याच कालावधीत बिबट्यांनी 498 जनावरे फस्त केली आहेत. त्यामुळे पशुपालकांना 39 लाख 65 हजार रुपये आर्थिक मदत देण्यात आलेली आहे.

बिबट्यांना त्रास दिल्यास गुन्हा दाखल

खूप वाकून शेतीची कामे करु नका, असे केल्यास चार पायाचा प्राणी आहे असे समजून बिबट्याचा पाठमोरा हल्ला होऊ शकतो. शेतीची कामे सुरु असतांना टेपरेकॉर्डरवर किंवा स्पीकरचा वापर करुन मोठ्या आवाजात गाणी सुरु ठेवा, . शेतीचे कामे शक्यतो समूहाने करा, गावात, जंगलात, शेतात अथवा गावठाण हद्दीत बिबट दिसल्यास बघण्यास गर्दी करू नये अथवा दगड मारून पळवून लावण्याचा प्रयत्न करू नये, शेतकर्‍यांनी मानेभोवती हातरूमाल किंवा मफलर गुंडाळावी, बिबट्यांची किंवा रान मांजराची पिल्ले आढळल्यास वनविभागस माहिती द्या,असे आवाहन उपवनसंरक्षक सुवर्णा माने यांनी केले आहे. बिबट्यांना त्रास होईल असे कोणतेही वर्तन केल्यास वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कायद्याने गुन्हा असल्याचे त्या म्हणाल्या.

गेल्या वर्षी 24 व्यक्ती जखमी, 839 जनावरे केली लक्ष्य

गेल्या आर्थिक वर्षात बिबट्याच्या हल्ल्यात 1 जण मृत्यूमुखी पडला आहे. संबंधित व्यक्तीच्या वारसांना मदत अदा करण्यात आली. बिबट्यांच्या हल्ल्यात 24 व्यक्ती जखमी झाल्या असून, त्यांना 10 लाख 73 हजारांची आर्थिक मदत करण्यात आलेली आहे. बिबट्याने 839 जनावरे फस्त केली. त्यामुळे शासनाने पशुपालकांना 56 लाख 57 हजारांची मदत केली आहे.

Back to top button