पाथर्डी : 108 रुग्णवाहिकांचा कर्तव्यात कसूर | पुढारी

पाथर्डी : 108 रुग्णवाहिकांचा कर्तव्यात कसूर

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : उपजिल्हा रुग्णालयात 108 रुग्णवाहिकेच्या चालकांकडून सेवा देताना कर्तव्यात कसूर केला जात असल्याने, खासगी रुग्णवाहिकांची मनमानी सुरू आहे. त्यामुळे 108 रुग्णवाहिकेच्या कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष अरविंद सोनटक्के यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकार्‍यांना निवेदन दिले आहे. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक व पाथर्डीचे पोलिस निरीक्षक यांनाही देण्यात आल्या आहेत.

निवेदनात म्हटले आहे की, पाथर्डी तालुक्यात 108 रुग्णवाहिकेची सेवा म्हणजे रुग्णांसाठी ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी झालेली आहे. फोन लावल्यानंतर गाडीची सेवा योग्य त्या वेळेत उपलब्ध होत नाही. गाडीच उपलब्ध नाही, अडीच ते तीन तासाने येईल किंवा तालुक्यातील दुसरी गाडी मागून घेऊ. तिला येण्यासाठी किमान 2 तासांचा वेळ लागेल किंवा आपली इच्छा असल्यास खासगी गाडीची सोय करून रुग्णाला घेऊन जा, अशी उडवाउडवीची दिली जातात. गाडी दवाखान्याच्या पाठीमागच्या बाजूला उभी असतानाही, नसल्याचेे सांगितले जाते. अपघात झाल्यावर किंवा तातडीची गरज असताना 108 रुग्णवाहिकेची सेवा कधीही वेळेवर उपलब्ध होत नाही. खासगीरुग्ण वाहिकेची सेवा घेण्यास भाग पाडले जाते. यातून रुग्णाच्या नातेवाईकांची आर्थिक लूट केली जात आहे.

याचा गांभीर्याने विचार होऊन पाथर्डी येथील रुग्णालयातील चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यात याव्यात, खासगी रुग्णवाहिका रुग्णालयाच्या बाहेर काढाव्यात, 108 गाडी रुग्णालयाच्या दर्शनीय भागात लावण्यात यावी तातडीने सेवा मिळण्यासाठी संबंधित वाहन चालक व डॉक्टराना सूचना देण्यात याव्यात. नातेवाईकाची व रुग्णाची होणारी आर्थिक लूट थांबविण्यात यावी. याबाबत येत्या 15 दिवसांत यावर कार्यवाही न झाल्यास रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे.

 

खासगी रुग्णवाहिकेच्या वाहतुकीसाठी लागणारे परिवहन विभागाचे परवाने या संबंधित चालकाकडे नाहीत. अवैधरित्या ही वाहतूक करण्यात येते. या संदर्भात आपण उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे तक्रार करणार आहोत.
                            – अरविंद सोनटक्के, जिल्हा उपाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी

Back to top button