जामखेड : धोत्री परिसरातील खुनाचा उलगडा

जामखेड; पुढारी वृतसेवा : जामखेडमधील धोत्री परिसरात आढळून आलेल्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याचा खून झाल्याचे निष्पन्न झाले असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्याला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्या 10 नोव्हेबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

धोत्री परिसरातील कापसाच्या जुन्या जिनिंगसमोर 24 ऑक्टोबर रोजी सकाळी 6.30 वाजता एका तरूणाचा नग्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. हा मृतदेह गणेश शिवाजी वारे (वय 30, रा. संगमजळगाव, ता.गेवराई, जि.बीड) याचा असल्याचे निष्पन्न झाले होते. प्रथमदर्शनी अज्ञात आरोपींनी त्याच्या शरीरावर विविध ठिकाणी मारहाण करून खून केल्याचे आढळून आले होते. याप्रकरणी शिवाजी मारूती वारे यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला. ऐन दिवाळीत ही घटना घडल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली होती.

पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी दोन पथके तयार केली होती. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली. दीपक रणजित भवर (रा. सावरगाव, ता. जामखेड) याने हा खून केल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर, तपास अधिकारी सुनील बडे, उपनिरीक्षक राजू थोरात यांच्या पथकाने त्यास साकत फाटा परिसरातून ताब्यात घेतले.

पोलिसी खाक्या दाखविताच त्याने खुनाची कबुली दिली. काही दिवसांपूर्वी मयत गणेश वारे याने मोबाईल चोरी केला होता. दि.23 ऑक्टोबर रोजी वारे हा मोहा फाट्यावर दिसल्याने आरोपी दीपक भवर व त्याच्या दोन साथीदारांनी त्यास स्कूटीवर बसवून धोत्री शिवारात जिनिंगजवळ नेऊन नग्न करीत काठ्या व होज पाईपने मारहाण करून त्याचा खून केल्याचे सांगितले आहे

Exit mobile version