वाळकी : बंधार्‍यात बुडून शेतकर्‍याचा मृत्यू | पुढारी

वाळकी : बंधार्‍यात बुडून शेतकर्‍याचा मृत्यू

वाळकी : पुढारी वृत्तसेवा :  नदीवरील बंधार्‍यातून पोहोत पुढील तिरावर जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या शेतकर्‍याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नगर तालुक्यातील भातोडी पारगाव शिवारात शुक्रवारी (दि.4) दुपारी घडली. ज्ञानेश्वर विठ्ठल घोलप (वय 45, रा.भातोडी पारगाव, ता.नगर) असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे. मृत घोलप यांचे गावच्या शिवारातील शिवाचा मळा या परिसरात शेत आहे. तेथे शेताच्या कडेला असलेल्या नदीवर मोठा बंधारा आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने सदरचा बंधारा पाण्याने तुडुंब भरला आहे. नदी पलीकडील शेतात जाण्यासाठी जवळपास कुठे पूल वगैरे नसल्यामुळे ज्ञानेश्वर घोलप हे केबल घेऊन दुसर्‍या तिरावर पोहोत जात होते.

बंधार्‍याच्या मध्यभागी गेल्यानंतर ते अचानक पाण्यात बुडाले व त्यांचा मृत्यू झाला. मृत घोलप यांना चांगले पोहोता येत होते. परंतु त्यांच्या पायात काही अडकले किंवा पोहोताना त्यांचा दम तुटला आणि ते बुडाले, हे मात्र समजू शकले नाही. या घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या नागरिकांनी तेथे धाव घेऊन त्यांचा पाण्यात शोध घेतला व त्यांना पाण्यातून बाहेर काढले. त्यानंतर त्यांचे पुतणे किरण रामदास घोलप यांनी तातडीने त्यांना उपचारासाठी नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात आणले. मात्र, डॉक्टरांनी त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. याबाबत नगर तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत घोलप यांच्यामागे आई, पत्नी, 1 मुलगा, 1 मुलगी, 1 भाऊ, भावजय, पुतणे असा परिवार आहे. या घटनेने भातोडी पारगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Back to top button