नगर : श्वेतपत्रिका काढून गुन्हे दाखल करू ! विकास मंडळात अनियमितता; अध्यक्षांचा आरोप | पुढारी

नगर : श्वेतपत्रिका काढून गुन्हे दाखल करू ! विकास मंडळात अनियमितता; अध्यक्षांचा आरोप

नगर : पुढारी वृत्तसेवा : विकास मंडळाच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार आणि अनियमितता झालेली आहे. सर्वसाधारण सभेत जुन्या मंडळाच्या कारभाराचा आरसा सभासदांसमोर मांडणार आहोत. तसेच, त्यांच्या चुकीच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढून दोषींवर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा विकास मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष विलास गवळी यांनी दिला. विकास मंडळाची सत्ता रोहोकले गुरुजीप्रणित गुरुमाऊली मंडळाकडे होती. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत बापूसाहेब तांबे यांची मंडळावर सत्ता आली. तांबे गटाचे विलास गवळी यांची विकास मंडळाच्या अध्यक्षपदी निवड होताच त्यांनी विकास मंडळाच्या अर्धवट इमारत प्रश्नाला हात घातला आहे.

बापूसाहेब तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली व पदाधिकारी, सभासदांच्या सहकार्यातून या ठिकाणी सुपर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल बनविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. पूर्वीच्या सत्ताधार्‍यांनी विकास मंडळाच्या झालेल्या कामाचे योग्य प्रकारे टेंडर काढलेले नाही, कमी दराने आलेल्या ठेकेदाराला काम देण्याऐवजी मर्जीतील जास्त दराने काम वाटप करण्यात आलेले आहे. आता लवकरच सर्वसाधारण सभा घेऊन त्यात हा प्रकार सभासदांसमोर मांडणार आहोत. विकास मंडळाच्या कारभाराची लवकरच श्वेतपत्रिका काढण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. त्यात इमारतीचे किती काम झाले, त्याच्या मोबदल्यात ठेकेदाराला किती पैसे दिले, किती देणे बाकी आहे, पैसे किती जमा झाले होते, उर्वरित पैसे कोणाकडे आहेत, जास्त दराने टेंडर का दिले, त्याला जबाबदार कोण-कोण आहे, याची चौकशी होऊन प्रसंगी दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशाराही गवळी यांनी दिला आहे.

सूडबुद्धीने वागाल; तर तसेच उत्तर देऊ : शिंदे

तत्कालीन विश्वस्त मंडळाने विकास मंडळाच्या जीर्णोद्धारासाठी हिताचेच काम केले. त्यात कोणत्याही प्रकारची आर्थिक अफरातफर, अनियमितता नाही. तरीही कोणी गुन्हे दाखल करण्याची भाषा करत असेल, तर खुशाल चौकशी करा, आम्ही तयार आहोत. मात्र, सूडबुद्धीने वागाल, तर जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा रोहोकले गटाचे तत्कालीन अध्यक्ष संजय शिंदे यांनी दिला.
शिंदे म्हणाले, मी अध्यक्ष असताना 2018 मध्ये विकास मंडळाचे नाट्यगृह, शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्यासाठी निविदा मागविल्या होत्या. बांधकाम रक्कम 10 कोटींच्या आसपास होती. हे काम 77 लाखाने कमी दिले होते. यापेक्षा कमीच्या निविदांना तांत्रिक अडचणी होत्या. साधारणतः 9.55 कोटींच्या दरम्यान हे काम दिले होते. रोहोकले गुरुजी हे त्यावेळी स्वीकृत विश्वस्त होते. त्यांच्या मार्गदर्शनात आम्ही सर्व विश्वस्तांनी सभासद आणि मंडळाच्या हिताचाच कारभार केला आहे.

विकास मंडळाची इमारत उभी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. मात्र, तत्कालीन बँकेच्या सत्ताधार्‍यांनी ठेवी वर्ग करण्यास विरोध केल्यामुळेच हे काम बंद पडल्याचे सर्वांना माहिती आहे. याउलट, विकास मंडळाच्या इतिहासात आम्ही एवढे चांगले काम करूनही, जर आमच्यावर गुन्हे दाखल करणार असतील, तर आमची तयारी आहे, आम्ही घाबरून जाणारे नाही. आमच्या कारभारात कोठेही अनियमितता नाही, कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार नाही. त्यामुळे आम्ही कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याच्या तयारीत आहोत, असेही शिंदे यांनी आवर्जून सांगितले.

Back to top button