कर्जत-जामखेड : आरोप-प्रत्यारोप नको, विकासाची व्हावी स्पर्धा! | पुढारी

कर्जत-जामखेड : आरोप-प्रत्यारोप नको, विकासाची व्हावी स्पर्धा!

गणेश जेवरे :

कर्जत : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे माजी मंत्री आमदार प्रा.राम शिंदे यांच्यातील आरोप-प्रत्यारोपाचे फटाके फुटत आहेत. मात्र या दोन्ही जबाबदार लोकप्रतिनिधींचे एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोपापेक्षा विकास कामांची स्पर्धा पाहण्यासाठी कर्जत-जामखेडकरांचे डोळे आसुसले आहेत.  कर्जत जामखेड मतदार संघ तसा भाजपचा बालेकिल्ला. मात्र राष्ट्रवादीचे आ. रोहित पवार यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवित भाजपच्या बालेकिल्ल्याला धक्का दिला. भाजपचे तत्कालीन मंत्री प्रा. राम शिंदे यांचा पराभव करत पवारांनी घड्याळाची टिकटिक सुरू केली.

त्यावेळी राज्यातील लक्षवेधी लढतीत कर्जत-जामखेडची निवडणूक चर्चेत होती. राजकीय घडामोडीनंतर भाजपला सत्तेपासून रोखण्याकरीता महाविकास आघाडीचा प्रयोग राबविला गेला.  राष्ट्रवादी सत्तेत गेल्याने आ. रोहित पवार यांना मतदारसंघात विकास निधी आणण्यासाठी बळ मिळाले. शरद पवारांचे नातू, अजित पवारांचे पुतणे या वलयामुळे आ. रोहित पवार यांनाही निधीची कमतरता भासली नाही. कर्जत एसटी डेपोला केवळ मंजुरीच नव्ेहे तर त्यासाठी निधीही मिळाला. जामखेडमध्ये नियोजीत राज्य राखीव दलाचा इतरत्र गेलेला प्रकल्प आ. पवार यांच्या पाठपुराव्याने परत आला. कर्जत एमआयडीसीचा प्रश्न अंतिम टप्प्यात आहे. कर्जतचे सत्र न्यायालयासह सुविधा उपलब्ध करून देण्यावर आ. रोहित पवार यांनी भर दिला.

दरम्यानच्या काळात राज्यात पुन्हा सत्तापालट झाला. महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि शिवसेनेचा शिंदे गट-भाजप सरकार सत्तारूढ झालं.  पवारांच्या झंझावती कामामुळे भाजपचा बालेकिल्ला हातातून निसटून जाईल, या चिंतेतून भाजप पक्षश्रेष्ठींनी प्रा. राम शिंदे यांना विधानपरिषदेची संधी देत पुर्नवसन केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपातील दिग्गजांना डावलत राम शिंदे यांना आमदार केले. त्यामुळे भाजपात नवचैतन्य निर्माण झाले. भाजप सत्तेत असल्याने आ. शिंदे पुन्हा ‘लाल दिवा’ मिळण्याची आशा पल्लवीत झाली.  पहिल्या टप्प्यात डावलले गेले तरी विस्तारांत संधी मिळेल, ही कर्जत-जामखेडच्या भाजप पदाधिकार्‍यांमधील आशा अजूनही मावळलेली नाही.

भाजप-राष्ट्रवादी संघर्ष टोकाला
भाजप आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमधील संघर्ष आता टोकाला पोहोचल्याची दिसून येते. सोशल मीडियासह पारावरच्या गप्पांमध्ये देखील कार्यकर्ते आरोप-प्रत्यारोप करताना दिसून येतात. आ. राम शिंदे, आ. रोहित पवार हेही आता एकमेकांवर आता उघडपणे टीका करू लागले आहेत. सुरुवातीला सौम्य असलेल्या टीकेची पातळी आता हळूहळू पातळी घसरू पाहत असल्याचे चित्र आहे. मविआच्या कार्यकाळात उद्घाटनं झालेली विकास कामे पूर्वीच मंजूर असल्याचे दावा भाजप कार्यकर्ते करू लागले आहेत. एकूणच विकास कामांच्या श्रेय वादावरून देखील एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. मतदार संघातील विकास कामे शिंदे-फडणवीस सरकारने अडविल्याचा आरोप आ. रोहित पवार करत आहेत.

आमदारद्वयी राजकीय प्र‘बळ’
आ. शिंदे व आ. पवार यांच्यातील हा राजकीय संघर्ष विकासात्मक व्हावा, अशी सामान्यांची अपेक्षा आहे. सामान्य कार्यकर्ता ते मंत्रीपद असा आ. राम शिंदे यांचा प्रवास पाहता त्यांना मतदारसंघातील प्रश्नांची इत्यंभूत जाण. मंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांनी प्रश्न सोडविण्यासोबतच निधीही आणला. दुसरीकडे आ. पवार यांचा अभ्यास आणि प्रश्न सोडवणूक, पाठपुरावा आणि त्यासाठी निधी आणण्याची हतोटीमुळे दोन्ही आमदारद्वयींमधील संघर्ष हा विकासात्मक स्पर्धेत रुपांतर व्हावा, याकडे मतदारसंघातील जनतेचे डोळे लागले आहेत. पवार आडनावाचे वलय आणि आ. शिंदेंचे वजन, प्रतिष्ठा पाहता विकासाची स्पर्धा लागून कोण होणार विजेता? याची चर्चा हळूहळू झडण्यास सुरूवात झाली आहे. आरोप-प्रत्यारोपातून दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांचे, मतदारांचे मनोरंजन होवून मनोबल वाढविण्याव्यतिरिक्त काहीच हाशील होणार नाही. त्यापेक्षा दोन्ही आमदारद्वयींनी राजकीय शक्तीचा वापर करत विकासात्मक स्पर्धा करून कर्जत-जामखेडचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी संघर्ष करावा, हीच आमजनतेची अपेक्षा.

Back to top button