पारनेर : पालकमंत्र्यांच्या आदेशाला दाखविला ठेंगा! | पुढारी

पारनेर : पालकमंत्र्यांच्या आदेशाला दाखविला ठेंगा!

पारनेर; पुढारी वृत्तसेवा: पारनेर तालुक्यातील गोरेगाव येथे अतिवृष्टीमुळे अनेक पिके वाया गेली. शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. तालुक्यात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अतिवृष्टी झालेल्या गावांमध्ये जाऊन पिकांची पाहणी करून पंचनामे करावे, असा आदेश तालुक्यातील तहसील प्रशासनाला दिला; मात्र पालकमंत्र्यांच्या या आदेशाला गोरेगावमध्ये ठेंगा दाखवला गेला!
तलाठी, ग्रामसेवकाने गावात पंचनामाच केला नाही. यामुळे गोरेगावातील शेतकर्‍यांना कोणी वाली नाही का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

दिवाळी सणात शेतकरी चिंताग्रस्त असताना अधिकारी मात्र दिवाळीचा मोठा आनंदात घेत होते. ग्रामस्थांनी अनेक वेळा प्रशासकीय अधिकार्‍यांना पंचनामा करण्याची विनंती केली; मात्र त्यांच्या विनंतीची अधिकार्‍यांनी दखल घेतलेली नाही. आता अनेक शेतकरी चिंताग्रस्त असून, शेतीमध्ये सततच्या पडणार्‍या पावसामुळे मोठ्या प्रमाणात गवताचे साम्राज्य झाले आहे. एकीकडे पीकही वाया गेले आहे. दुसरीकडे अधिकारी पंचनामाही करत नाही, तर आत्ता एक-दोन दिवसांपूर्वी पावसाने उघडकीस दिल्यामुळे शेतकर्‍यांना आपले शेत मशागत करायचे आहे.

अशा तिहेरी संकटात शेतकरी सापडला असताना अधिकारी; मात्र पंचनामा करण्यासाठी डोळे झाक करत आहे. तेलही गेले अन् तूपही गेले, हाती धुपाटणे आले, अशी अवस्था शेतकर्‍यांची झाली आहे. येत्या दोन दिवसांमध्ये पंचनामे झाली नाही, तर तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा गोरेगावातील शेतकर्‍यांनी दिला.

शासनाचे स्पष्ट आदेश
शेतातील सर्व पिकांचे पंचनामे करण्याचे शासकीय अधिकार्‍यांना शासनाचे स्पष्ट आदेश असताना तलाठी व ग्रामसेवक कृषी सहायकांनी एकही पंचनामा केला नाही. यामुळे शासनाच्या आदेशाला अधिकार्‍यांनी केराची टोपली दाखवली आहे.

शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन सात ते आठ दिवस झालेत. अधिकार्‍यांना अद्यापपर्यंत जाग आलेली नाही. दोन दिवसांपासून पावसाने उघडकीस दिल्याने शेती मशागत करण्याची वेळ आली आहे. अद्यापपर्यंत पंचनामे झाले नाहीत. अधिकार्‍यांसह तहसीलदारांचा तालुक्यात ढिसाळ कारभार आहे. तहसील प्रशासनाने त्वरित पंचनामे करून शेतकर्‍यांना न्याय द्यावा.
                                                          – सुमन तांबे, सरपंच, गोरेगाव

Back to top button