श्रीगोंद्यात 1767 हेक्टर पिकांचे पावसाने नुकसान | पुढारी

श्रीगोंद्यात 1767 हेक्टर पिकांचे पावसाने नुकसान

अमोल गव्हाणे : श्रीगोंदा : गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने अक्षरशः शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले असून, पाऊस आता नकोसा झाला आहे. सप्टेंबरमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे 1 हजार 767 .46 हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान झाले. या पिकांच्या भरपाईसाठी 4 कोटी 25 लाख 81 हजार रुपयांची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसात जोरदार पावसामुळे 3 हजार सातशे हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत असून, महसूल व कृषी विभागांकडून युद्धपातळीवर पंचनामे करण्याचे काम सुरू आहेत.

चालू वर्षी पावसाने अनेक वर्षाची आकडेवारी मोडीत काढली आहे. गेल्या चोवीस तासांत तालुक्याच्या पूर्व भागात पावसाने थैमान घातले असून कपाशी, तूर, बाजरी, कांदा ही पिके सडून गेले आहेत. महसुल व कृषी विभाग नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करीत असून, गेल्या महिन्यात पडलेल्या पावसाने नुकसानीची माहिती राज्य सरकारला कळविण्यात आली आहे. चालू महिन्यात तालुक्यातील चिंभळा, देवदैठण, काष्टी आणि पेडगाव या चार महसूल मंडळांत अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे, तर इतर महसुली मंडळांत अवकाळी पावसाची नोंद करण्यात आली.

तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर म्हणाले, नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे सुरू आहेत. कृषी सहायक अथवा कामगार तलाठी यांच्याशी संपर्क करून माहिती द्यावी. त्याचबरोबर ज्या फळबागधारक शेतकर्‍यांनी विमा उतरविला आहे, त्या शेतकर्‍यांनी संबंधित कंपनीच्या अधिकारी अथवा टोल फ्री क्रमाकांवर संपर्क साधून माहिती द्यावी.

Back to top button