सीनेच्या पुरात ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा कर्मचारी बेपत्ता ; निमगाव गांगर्डा येथील घटना | पुढारी

सीनेच्या पुरात ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा कर्मचारी बेपत्ता ; निमगाव गांगर्डा येथील घटना

कर्जत : पुढारी वृत्तसेवा :  कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथील ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा कर्मचारी अशोक गंगाधर गांगर्डे हे सीना नदी ओलांडताना पुरात वाहून गेले आहेत. सिद्धटेक येथून विशेष पथकांकडून त्यांचा शोध सुरू असून, गेल्या 72 तासांनंतरही शोध लागलेला नाही.  गांगर्डे हे नेहमीप्रमाणे गावाला पाणी सोडण्यासाठी वस्तीवरून गावांमध्ये आले होते. पाणी सोडल्यानंतर परत जात असताना परिसरामध्ये जोरदार पाऊस पडला. रात्रीचे सात वाजल्याने अंधार पडला होता. नदीची पाण्याची पातळी वाढलेली होती आणि प्रवाहाला वेग होता. परंतु त्याचा अंदाज न आल्याने नदी ओलांडताना ते पाण्यात वाहून गेले. घटनेपूर्वी त्यांच्या मुलीने गांगर्डे यांना फोन केला असता मी नदीजवळ आलेलो असून, काही वेळातच घरी येतो, असे सांगितले.

परंतु बराच वेळ झाल्यानंतरही वडील घरी न आल्याने मुलीने परत त्यांना फोन केला असता मोबाईल स्विच ऑफ लागला. यानंतर गावामध्ये फोन करून विचारणा केली असता काही जणांनी अशोक गांगर्डे यांना नदीपात्राकडे जाताना पाहिल्याचे सांगितले. त्यानंतर सर्वजण नदीवर आले, परंतु त्यांना कुठेही अशोक गांगर्डे दिसले नाहीत. तेव्हापासून अजूनही ते बेपत्ता आहेत.
पथकाने नदीपात्रामध्ये बोटीसह काही किलोमीटर अंतरावर जाऊन शोध मोहीम राबविली. मात्र, गांगर्डे यांचा अद्याप शोध लागलेला नाही. यावेळी तहसीलदार नानासाहेब आगळे, पोलिस उपनिरीक्षक दिवटे यांच्यासह नगर येथून आलेले आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

सीना नदीला पूर आलेला असून, निमगाव गांगर्डा या गावातील पुलाच्या ठिकाणी आतापर्यंत चार गाड्या वाहून गेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी पुलावरून पाणी असताना त्यातून जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. दरम्यान, प्रशासनाने आता या पुलावरून जाण्याचा रस्ता बंद केला आहे, अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक दिवटे यांनी दिली.

Back to top button