भक्ष्याच्या शोधात, बिबट्या थेट विहिरीत! | पुढारी

भक्ष्याच्या शोधात, बिबट्या थेट विहिरीत!

नेवासा : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील गोमळवाडी शिवारात भक्ष्याच्या शोधातला बिबट्या थेट कोरड्या विहिरीत पडला. त्याला पाहण्यास शुक्रवारी सकाळी नागरिकांची गर्दी झाली होती. दुपारी वनविभागाने ग्रामस्थांच्या सहाय्याने पिंजरा सोडून बिबट्याला सुखरुपपणे विहिरीबाहेर काढले. गोमाळवाडी येथील बापूराव पुंजाजी गाडेकर यांच्याकडे ओढ्याजवळील जोगेश्वरी देवी देवस्थानच्या इनामी शेती आहे. गुरूवारी रात्री भक्ष्याच्या शोधात भटकणारा बिबट्या या शेतातील कोरड्या विहिरीत पडला. शुक्रवारी (दि.14) सकाळी 6.30 च्या सुमारास गाडेकर शेतात चारा आणण्यासाठी गेले असता, विहिरीतून आवाज येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी डोकावून पाहिले असता बिबट्या दिसून आला.

गोमळवाडी व परिसरात ही वार्ता पसरल्याने ग्रामस्थांनी गर्दी केली. सरपंच, उपसरपंच व नागरिकांनी वनविभागाला कल्पना दिल्यानंतर दुपारी 2 च्याा सुमारास वन अधिकारी, कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने पिंजर्‍याच्या साहाय्याने बिबट्याला सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले.

गोमळवाडी परिसरात तत्काळ पिंजरा लावा
गोमळवाडी परिसरामध्ये बिबट्याचा वावर सातत्याने असून, ग्रामस्थांना नेहमी त्याची धास्ती असते. नवरात्रोत्सवातही लोकांना कासव व बिबट्याचे दर्शन झाले होते. देवीचा चमत्कार असल्याचे लोक सांगत असलेतरी वनविभागाने या परिसरात पिंजरा लावावा, अशी मागणी अ‍ॅड. सुदामराव ठुबे यांनी केली आहे.

Back to top button