खेड : विजेच्या धक्क्यानेे म्हशीचा जागीच मृत्यू | पुढारी

खेड : विजेच्या धक्क्यानेे म्हशीचा जागीच मृत्यू

खेड : पुढारी वृत्तसेवा :  कर्जत तालुक्यातील करमणवाडी, राऊतवस्ती परिसरात अनेक दिवसानंतर नव्याने विजेची रोहित्रे बसविण्यात आली; मात्र रोहित्रे आणि खांबांची उभारणी करताना वीज कंत्राटदारांनी अनेक ठिकाणी ताण तारांमध्ये वीजप्रवाह उतरू नये, म्हणून वीजप्रवाह खंडित करणारे चिनीमातीचे कप जोडलेले नाहीत. त्यामुळे वीजप्रवाह जमिनीत उतरत आहे. याचाच फटका एका गरीब शेतकर्‍याला बसला. विजेचा धक्क्याने एका म्हशीचा मृत्यू झाला आहे.

झुंबर रामभाऊ दानवले (रा.राशीन, राऊतवस्ती) मोकळ्या शेतात जनावरे चारत असताना खांबांना जोडलेल्या ताण तारांमध्ये वीजप्रवाह आल्याने म्हशीचा तडफडून जागीच मृत्यू झाला. राऊतवस्ती, करमनवाडी परिसरात उच्चदाब वितरण प्रणाली (एच.व्ही.डी.एस) योजनेमार्फत नव्याने असंख्य रोहित्रे जोडण्यात आली; मात्र ठेकेदारांनी आवश्यक चिनीमातीचे कप वापरले नाही. नागरिकांच्या व जनावरांच्या संरक्षणाची कसलीच काळजी घेतली नाही. अनेक ठिकाणी तर रिजेक्ट झालेले साहित्य वापरून वीज जोडणी केली. याच्या परिणामी वीजप्रवाह जमिनीवर उतरून म्हशीचा मृत्यू झाला.

Back to top button