नगर : औरंगाबाद-पुणे सहापदरी महामार्गाचा घेतला आढावा | पुढारी

नगर : औरंगाबाद-पुणे सहापदरी महामार्गाचा घेतला आढावा

नगर; पुढारी वृत्तसेवा: औरंगाबाद-अहमदनगर-पुणे या नियोजित 268 कि.मी. लांबीच्या सहापदरी ग्रीनफील्ड एक्सप्रेस महामार्गाच्या नगर जिल्हयातील कामांचा, महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आढावा घेतला. सोमवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर या महामार्गाच्या कामांचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे सादरीकरण करण्यात आले. यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, सर्व आमदार व अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री विखे पाटील यांनी या महामार्गासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्यावतीने करण्यात येणारे भूसंपादन, जिल्हयातून जाणार्‍या महामार्गावरील गावांसाठी सर्व्हिस रोड करणे, जिल्हयातील प्रमुख रस्ते महामार्गाला जोडणे व अन्य कामांचा आढावा घेतला आणि महामार्ग प्राधिकरणाला सूचना केल्या. भविष्यातील गरजा ओळखून अहमदनगर शहराला या नियोजित महामार्गाला जोडण्याची सूचना खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी केली.

तसेच बैठकीत जिल्हयातील सर्व लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचनांचा या आराखडयात समावेश करावा अशा सूचना पालकमंत्री विखे पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास दिल्या. महामार्ग प्राधिकरणाचे संचालक प्रफुल्ल दिवाण यांनी महामार्गाचा कामकाज आराखडा बैठकीत सादर केला. नियोजित महामार्ग राज्यातून जाणार्‍या सुरत-चेन्नई, पुणे-बेंगरुळू आणि समृदी महामार्गाला जोडण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Back to top button