नगर : अहवालात दोषी आढळणार्‍यांवर कारवाई होणार: महसूल तथा पालकमंत्री विखे | पुढारी

नगर : अहवालात दोषी आढळणार्‍यांवर कारवाई होणार: महसूल तथा पालकमंत्री विखे

नगर; पुढारी वृत्तसेवा: जिल्हा रुग्णालयातील अग्नितांडव प्रकरणाचा चौकशी अहवाल शासनाच्या आरोग्य विभागाला सादर झालेला आहे. मात्र, याबाबत मला काही माहिती नाही. अहवालात कोणावर दोषारोप सादर केले, या माहितीसाठी आरोग्य विभागाकडून अहवाल मागविला जाईल. अहवालात जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे. दरम्यान, वाढती लोकसंख्या आणि कामाचा व्याप लक्षात घेता नगर शहरासाठी स्वतंत्र तहसील कार्यालय मंजूर केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महसूल मंत्री तथा पालकमंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा नियोजन अधिकारी नीलेश भदाने हे उपस्थित होते.
जिल्हा रुग्णालयात झालेल्या अग्निताडवात 14 जण दगावले असून, या घटनेला वर्ष होत आले असून, चौकशी अहवाल शासनाला सादर झाला आहे.

मात्र, अद्याप दोषी कोण आहेत आणि त्यांच्यावर काय कारवाई होणार याकडे महसूल मंत्री तथा पालकमंत्री विखे पाटील यांचे लक्ष वेधण्यात आले. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी चौकशी अहवाल आरोग्य विभागाला सादर केला आहे. त्यामुळे नव्याने चौकशी करण्याची गरज नाही. मी काही हा अहवाल पाहिलेला नाही. आरोग्य विभागाकडून मो मागविला जाईल. उपलब्ध झाल्यानंतर काय परिस्थिती आहे, याची माहिती आगामी आठवड्यात दिली जाईल, असे महसूल मंत्री तथा पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितले. मात्र, जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई अटळ असल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या नगर शहर आणि नगर तालुक्यासाठी एकच तहसील कार्यालय आहे. शहराची आणि तालुक्याची वाढती लोकसंख्या आणि कामाचा व्याप लक्षात घेता, सध्या नगर तहसील कार्यालय अपुरे पडत आहे. नगर शहर आणि तालुक्यातील ग्रामीण भागासाठी स्वतंत्र तहसील कार्यालय आवश्यक असल्याचा ठराव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत झाला. त्यानुसार नगर शहर व तालुक्यासाठी स्वतंत्र तहसील कार्यालय निर्माण करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना दिले आहेत. शासनाकडे प्रस्ताव जाताच नवीन तहसील कार्यालयाचा निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात क्रीडा विभागाची अनास्था असून, प्रशासकीय पातळीवरील कामगिरी देखील निराशाजनक आहे. हे चित्र बदलण्यासाठी सर्वकष क्रीडा विकास आराखडा तयार करा. यासाठी राज्य व देशपातळीवरील पुरस्कारप्राप्त खेळाडूंना बोलवा. त्यांचे विचार घेऊन तो आराखडा तयार करा, असे निर्देश जिल्हाधिकारी यांना दिल्याचे सांगितले. तालुका क्रीडा संकूलांची अवस्था देखील बिकट आहे. नामांकित महाविद्यालये आणि संस्थांना ही संकूले चालविण्यास द्यावीत. जेणेकरुन संकूलांची देखरेख व खेळाडूंना त्याचा उपयोग होईल.

अशोकराव चव्हाण यांचे वक्तव्य तथ्यहिन
फडणवीस सरकार सत्तेवर असताना शिवसेना व काँग्रेस या दोन पक्षाचे सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव तत्कालीन मंत्री एकनाथराव शिंदे काँग्रेसकडे घेऊन आले होते, या माजी मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या वक्तव्याकडे विखे पाटील यांचे लक्ष वेधले असता, ते म्हणाले की, माझ्यापर्यंत अशी काही चर्चा आली नव्हती. मात्र, चव्हाण यांचे वक्तव्य तथ्यहिन असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

सैनिक नसणार्‍यांचा शिवाजी पार्कवर मेळावा
दसर्‍याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील दोन मेळावे होत आहेत.शिवाजी पार्कवर होणारा मेळावा हा विचार गमावलेला आणि सैनिक नसलेला मेळावा असणार आहे. भाजपबरोबर युती केलेल्या शिंदें गटाचा मेळावा हा अधिक मोठा आणि विचाराशी बाधिलकी असणार असल्याचे मत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.

Back to top button