जामखेडमधील 28 शाळांचे भवितव्य धोक्यात | पुढारी

जामखेडमधील 28 शाळांचे भवितव्य धोक्यात

नान्नज :  पुढारी वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील 28प्राथमिक शाळांची माहिती गोळा करण्याचे काम शिक्षण विभागाने वेगाने हाती घेतल्याने तालुक्याच्या शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. तालुक्यातील 28 शाळा केवळ विद्यार्थ्यांच्या कमीपटामुळे बंद होण्याच्या धास्तीने विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षकांमध्ये अस्वस्था पसरली आहे. या 28 शाळा बंद केल्या तर 410 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात येणार आहे. यामधील अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत गट विकास अधिकारी प्रकाश पोळ व गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे यांना विचारणा केली असता, तालुक्यातील 20 पटापेक्षा कमी विद्यार्थी संख्या असणार्‍या शाळांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले.

शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणात वस्ती तेथे शाळा हे धोरण शासनाने अवलंविले त्यानुसार वाड्या-वस्त्यांसह दुर्गम भागात मोठ्या प्रमाणात शाळा सुरू करण्यात आल्या. त्यातून शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी झाले. मात्र, शासनाच्या नव्या निर्णयामुळे वाड्या-वस्त्यांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती आता निर्माण झाली आहे. 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करून तेथील विद्यार्थ्यांचे नजीकच्या शाळेमध्ये तर तेथील शिक्षकांचे आवश्यक ठिकाणी समायोजन करण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यामुळे 20 पेक्षा कमी पट असणार्‍या शाळांना टाळे लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

तालुक्यात गावनिहाय 20 पटापेक्षा कमी विद्यार्थी संख्या असणार्‍या शाळा पुढील प्रमाणे ः नान्नज 3, अरणगाव 4, हाळगाव 3, खर्डा 1, नायगाव 4, पाटोदा 2, तेलंगशी 7, सोनेगाव 1, साकत2, राजुरी 1 अशा 28 प्राथमिक शाळांची माहिती गोळा करण्याचे काम शिक्षण विभागाने हाती घेतले. शाळा बंदच्या निर्णयावर शासनाने फेरविचार करावा. अशी मागणी पालकांसह विद्यार्थ्यांमधून जोर धरू लागली आहे.

Back to top button