नगर : बायकोच्या त्रासाला कंटाळले नवरे! | पुढारी

नगर : बायकोच्या त्रासाला कंटाळले नवरे!

श्रीकांत राऊत : 

नगर : छळ केवळ महिलांचाच होतो असे नाही, तर पुरुषांचाही होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. न्याय मागण्यासाठी जशा महिला पोलिसांच्या भरोसा सेलकडे जातात, तसे पुरूषांनीही धाव घेतल्याची आकडेवारी समोर आली. बहुतांश प्रकरणात पत्नीकडून होणार्‍या जाचातून सुटका होण्यासाठी पुरूषांनी पोलिसांकडू न्याय मागितला आहे. नगर जिल्ह्यात गत चार वर्षांत तब्बल 932 पुरूषांनी पत्नीच्या जाचाविरोधात आवाज उठवित पोलिसांकडे न्याय मागितला आहे.  भारतातील पुरुषप्रधान संस्कृतीत महिलांवर जास्त अन्याय, अत्याचार होतो, असेच चित्र सर्रास पाहायला मिळते.

हे जरी खरे असले तरी पुरुषांचाही छळ होत असल्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत. नगर जिल्हा पोलिसांच्या भरोसा सेलकडे अन्यायाला वाचा फोडणार्‍या महिलांसोबतच पुरुषांच्याही तक्रारी येत आहेत. जानेवारी ते सप्टेंबर 2022 दरम्यान तब्बल 327 पुरूषांनी पत्नीकडून होणार्‍या अन्यायाविरोधात तक्रार केली आहे. विशेष म्हणजे, शहरासह ग्रामीण भागातील पुरूषांची संख्या तक्रारदारांमध्ये अधिक आहे. पती-पत्नींचे संसार उद्धवस्त होण्यामागे सासरबरोबरच माहेरचा हस्तक्षेप, हेही महत्त्वाचे कारण असल्याचे भरोसा सेलकडून सांगण्यात आले. नवरा-बायको दोघेही नोकरी करत असलेल्या कुटुंबात मुले संगोपनाच्या जबाबदार्‍या पार पाडणे कठीण होते. त्यातूनच दोघांमध्ये अनेकवेळा खटके उडतात. या सर्व भानगडीत पुरूषांना मानसिक आणि शारीरिक जाच सहन करावा लागत असल्याचे भरोसा सेलकडे आलेल्या तक्रारींवरून स्पष्ट होते. पती-पत्नीमधील कटुता व दुरावलेले संबंध जुळविण्यासाठी कुटुंबाला वेळ देण्याचे, आवाहन भरोसा सेलकडून करण्यात आले आहे.

या आहेत पुरूषांच्या तक्रारी
सासू-सासरे पत्नीचे कान भरवितात अन् पत्नीही ते सांगतील तसेच वागते. आई-वडिलांपासून वेगळे राहण्याचा हट्ट, पत्नी मला समजून घेत नाही, पत्नी तिच्या जुन्या मित्रांच्या सतत संपर्कात राहते, पत्नीच्या शॉपिंगला त्रासलोय.

छे..ही काय भांडणाची कारणे झाली?
नोकरी करणार्‍या पुरूषांना संशयित प्रवृत्तीच्या महिलांचा त्रास असल्याचीही प्रकरणे समोर आली आहेत. ऑफिसमधील फोन आल्यास संशय घेणे, नवर्‍याचा मोबाईल गुपचूप तपासणे, स्थावर मालमत्ता नावावर करून देण्याची मागणी, अशा कारणांवरून महिला वाद घालत असल्याचे प्रकार पुरूषांच्या तक्रारीतून समोर आले आहेत.

वर्षनिहाय पुरूषांच्या तक्रारी
वर्ष तक्रारी
2019 – 205
2020 – 135
2021 – 265
2022 – 327
एकूण – 932

 

Back to top button