
नगर : पुढारी वृत्तसेवा : चैतन्य पर्व असलेल्या नवरात्रोत्सवास आजपासून प्रारंभ होत आहे. त्यासाठी जिल्हाभरात सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. महाराष्ट्राची कुलस्वामीनी तुळजाभवानीचे माहेर असलेल्या बुर्हाणनगर, केडगावची रेणुकामाता, श्री क्षेत्र मोहट्याची मोहटादेवी, श्रीक्षेत्र राशीनची जगदंबा, कोल्हारची कोल्हूबाई, जेऊरची बायजाबाई, कोल्हारची भगवती माता, घोसपुरीची पद्मावती यासह सर्वच देवी मंदिरांमध्ये आणि घरोघर घट बसविण्याची जय्यत तयारी झाली आहे. देवीच्या स्वागतासाठी नगर जिल्हा सज्ज झाला आहे.
राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व कुलदैवत असणार्या राशीनच्या जगदंबा देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. आज (दि.26) घटस्थापनेपासून ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत चालणार्या आनंद उत्सवासाठी राशीनगरी सज्ज झाली आहे.
हलत्या दीपमाळेसाठी प्रसिद्ध असणारे व स्वयंभू अशी ओळख असलेल्या जगदंबा देवी मंदिरात पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात येणार आहे. नऊ दिवस महावस्त्रालंकार पूजा, आरती, धुपारती, ललित पंचमी, दुर्गाष्टमी, पासोडी पोत, होम पूर्णाहुती, विजयादशमीला पालखी सोहळा, कोजागिरी पौर्णिमामेला 'भळांदे' इत्यादी धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. ट्रस्टच्या वतीने मंदिर व शिखरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. मंदिर परिसर परिसरातील पूजेच्या साहित्यांची दुकाने सजली असून, बालगोपाळांसाठी मनोरंजनाची साधने, हॉटेल्स, कपड्याचे दुकाने यांची तयारी झाली आहे.
ग्रामपंचायतीकडून पालखी मार्ग व मंदिर परिसराची स्वच्छता, स्ट्रीट लाईट व्यवस्था, रस्त्यांची दुरुस्ती, तसेच पाऊतकाच्या ठिकाणी जेसीबी, रोलरच्या साह्याने रस्त्याचे सपाटीकरण व साफसफाई करण्यात आली आहे. तसेच, मंदिर परिसर व पालखी मार्गावरील अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत. तसेच, मंदिर परिसरामध्ये धुराळणी, फवारणी करण्यात आली आहे. कर्जतचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी उपाययोजनांची पाहणी केली. मोहटा देवी मंदिरातही तयारी पूर्ण झाली असून, आज, जिल्हा न्यायाधीश तथा देवस्थानच्या अध्यक्षांच्या हस्ते घटस्थापना होणार आहे. बुर्हाणनगर, केडगावसह सर्वच देवी मंदिरे सजली आहेत. सार्वजनिक मंडळांकडूनही देवीची स्थापना केली जाणार आहे.