शिंदे सरकारचा कुठलाच ठावठिकाणा नाही, काँग्रेस नेत्याची जोरदार टीका | पुढारी

शिंदे सरकारचा कुठलाच ठावठिकाणा नाही, काँग्रेस नेत्याची जोरदार टीका

संगमनेर, पुढारी वृत्तसेवा: महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर झालेल्या विविध विकास कामांवर शिंदे सरकारने स्टे लावला आहे. आम्ही विरोधी पक्षात असल्यामुळे निधी मिळायला अडचण येत आहे. राज्यातील सध्याच्या शिंदे सरकारचा ठाव ठिकाणा दिसत नाही. त्यामुळे विकास निधी मिळण्यास अडचणी येत असून सर्वसामान्य जनतेचे काम होत नसल्याची टीका काँग्रेसच्या नेत्या आणि माजी महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली.

सहकारातील ज्येष्ठ नेते भाऊसाहेब थोरात आणि हरितक्रांतीचे प्रणेते अण्णा साहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या महिला मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना ठाकूर म्हणाल्या की, ज्यांना कुणीच नाही त्यांचे मायबाप सरकारच असते. जर सरकारने दुर्लक्ष केलं तर त्यांनी कुणाकडे बघायचे असा सवाल करत, महाविकास आघाडी सरकारने अर्थसंकल्पात एकल महिलां आणि बाल संगोपनासाठी जाहीर केलेला निधी राज्यात नव्याने आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने रद्द केला. तो वाढीव निधी पूर्ववतपणे मिळावा यासाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदें आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रव्यवहार केला असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्याची व देशाची परिस्थिती बघता देशातील जनतेला शांती आणि ऐक्याची आवश्यकता आहे. काँग्रेस पक्ष हा भारत जोडोच्या माध्यमातून देशातील लोकांचे हित व संविधानाचे रक्षण करण्यासाठी उभा आहे. आगामी काळात भारत जोडोच्या माध्यमातून खासदार राहुल गांधीच्या माध्यमातून भारतात पुन्हा एकदा काँग्रेस जोमाने उभारी घेईल. त्याचबरोबर नव्याने मिळणारे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक गेहलोत यांचे महाराष्ट्र काँग्रेस पक्षातर्फे स्वागतच केले जाईल असेही त्यांनी सांगितले. व्यावसायिक दृष्टीकोनातून अमरावती-जबलपूर एक्सप्रेसला महत्व आहे. मात्र या लोकांना विकास न करता फक्त राजकारण करायचयचे आहे, असा‌ टोला अमरावती – जबलपूर एक्सप्रेच्या मुद्यावरून ठाकुर यांनी खासदार राणा यांना लगावला. त्यांच्या समवेत काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात, एकविरा फाउंडेशनचे अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे उपस्थित होत्या.

अमरावतीचे वातावरण खा. राणा यांनी दूषित केले

नवनीत राणा यांचा स्वभाव खोटेपणाचा आहे. तसेच त्यांना बोगस जातप्रमाणपत्र प्रकरणी न्यायालयाने त्यांना अजामीन पात्र वॉरंट बजावलेले आहे. त्यात त्यांनी जर कॉन्स्टिट्युशनल फ्रॉड केला असेल तर, त्यांना नक्कीच शिक्षा होणार असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या की, अमरावतीमध्ये संतश्रेष्ठ गाडगेबाबा या संतांचा सर्वधर्म समभावाचा विचार आहे. तिथे राणा यांचा युद्धाचे मैदान तयार करण्याचा प्रयत्न सुरू असून त्या अमरावती जिल्ह्याचे वातावरण दूषित करण्याचे काम करत असल्याची टीका त्यांनी केली.

Back to top button