
संगमनेर पुढारी वृत्तसेवा : 'कभी खुद को मेरे प्यार मे भुलाकर देख…..दुश्मनी अच्छी नही, मुझे दोस्त बना कर देख' हा शेर राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नेमका कोणाला उद्देशून करत कोणाला दोस्तीचं आवतनं दिलं याची चर्चा आता संगमनेरमध्ये रंगू लागल्या आहेत. एका पक्षातील सहकारी ते विरोधी पक्षातील पारंपरिक राजकीय विरोधक असलेले राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्यातील विरोध सर्वांना माहीत आहे. हे दोन्ही नेते एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडीत नाहीत.
संगमनेर तालुक्यातील२८ गावे शिर्डी विधानसभा मतदारसंघातील गावांचासमा वेश झाला आहे त्यामुळे राधाकृष्ण विखे यांचा संगमनेरशी संपर्क वाढलेला आहे. थोरातांचे संगमनेरातील राजकीय विरोधक कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमाच्या निमित्ताने विखे पाटील यांना पाचारण करत असतात. त्यातच गुरुवारी शहरातील सय्यदबाबा चौकात सुरू असणाऱ्या उर्स कमिटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कव्वालीच्या कार्यक्रमाला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हजेरी लावीत दर्ग्याचे दर्शन घेवून चादर चढवली. त्यानंतर कव्वालीचा आनंदही घेतला.
कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव दोन शब्द बोलताना विखे यांनी हिंदीतून केलेल्या भाषणात हा उत्सव संगमनेरच्या धार्मिक आणि सांस्कृतिक एकतेचे प्रतीक असून, विखे परिवाराने ही परंपरा कायम ठेवली आहे.त्यातून दिवंगत खासदार बाळासाहेब विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांशी जोडलेला ऋणानुबंध कायम राहिल्याकडे लक्ष वेधले. त्यांनी शिवसेनेतून निवडणूक लढविली तेव्हा सुध्दा सर्व समाज बांधवांनी त्यांना पाठबळ दिले. या दर्ग्याचे दर्शन घेतल्यानंतर एक नवी उमेद व प्रेरणा मिळत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले
यावेळी उद्योगपती मनिष मालपाणी भाजपचे शहराध्यक्ष ऍड श्रीराम गणपुले, तालुका अध्यक्ष डॉ. अशोकराव इथापे, अमोल खताळ, सतीष कानवडे, शौकत जहागीरदार जावेद जहागीरदार, राहुल भोईर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.