शेवगाव : वेश्या व्यवसायास राजकीय पाठबळ! | पुढारी

शेवगाव : वेश्या व्यवसायास राजकीय पाठबळ!

रमेश चौधरी :

शेवगाव : शहरातील मध्यवस्तीत सुरू असलेला बहुचर्चित वेश्याव्यवसाय येथील एका मध्यस्थ महिला दलालाच्या अल्पवयीन मुलीच्या खरेदी व्यवहारातील अटकेनंतर पुन्हा चर्चेत आला आहे. त्यामुळे अनेक गुन्हेगारी घटनांचे मूळ असलेला हा व्यवसाय पोलिसांच्या अगणित कारवाईनंतर देखील तग धरून असल्याने त्यामागील मोठे राजकीय, आर्थिक पाठबळ चर्चेचा विषय बनले आहे. शेवगाव शहरातील नेवासा रस्त्याच्या बाजूला मध्यवस्तीत असलेल्या शिवनगर भागात गेल्या अनेक वर्षांपासून अवैधरित्या वेश्याव्यवसाय सुरू आहे. त्यामुळे तेथे वावर असलेल्या मद्यपी व गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींचा त्या भागातील रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. अनेक परप्रांतीय वेश्या, महिला, मध्यस्थ दलालांनी या भागात जम बसविला आहे.

त्यांच्यामार्फत नवनवीन अल्पवयीन मुलींना व्यवसायासाठी प्रवृत्त केले जात आहे. त्यासाठी त्यांची खरेदी-विक्री देखील जोमात सुरू आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी साखळी पद्धतीने शिर्डी, श्रीरामपूर, कोपरगाव, मुंबई, ठाणे, पनवेल व इतर राज्यातून येथील महिला व मुली बदलून आणल्या जातात. त्यामागे देखील मोठे रॅकेट कार्यरत आहे. या व्यवसायामुळे जिल्ह्यातील व शेजारच्या मराठवाड्यातील अनेक गुन्हेगारांची येथे सतत ये-जा असते. त्यामुळे शहरासह तालुक्यातील कायदा सुव्यवस्था व सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आले आहे.
पोलिसांनी अनेक वेळा केलेल्या लहान-मोठ्या कारवाईनंतर हा व्यवसाय पूर्णपणे थांबलेला नाही. मोठ्या प्रमाणात मिळणार्‍या दलाली, कमिशनमुळे यातील बड्या हस्ती, मध्यस्थ महिला पुन्हा नव्या जोमाने हा व्यवसाय सुरू करतात.

त्यामुळे दरवेळी ही पोलिस कारवाई केवळ सोपस्कर ठरत आहे. कुख्यात गुंडाकडून केलेल्या अल्पवयीन मुलीच्या खरेदीवरून उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांच्या पथकाने शेवगाव येथून मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या मीनाबाई मुसवत या मध्यस्थ महिलेस अटक केली आहे. त्यामुळे येथील वेश्याव्यवसाय व त्यामागील गुन्हेगारी पुन्हा चर्चेत आली आहे. या व्यवसायाचे पूर्णपणे उच्चाटन होण्यासाठी त्याची शहरातील पाळेमुळे खणण्याची गरज आहे. तरच अनेक अल्पवयीन मुली, महिला यांच्या आयुष्याची येथे होणारी राखरांगोळी थांबेल. शहराचे देखील बिघडलेले स्वास्थ्य पूर्वपदावर येईल.

शिवनगर नाव बदलण्याची मागणी
देहविक्री व मुलींची खरेदी-विक्री यामुळे अनेक वेळा तुरुगांची हवा खाऊनही येथे दशा व नशा अविरत चालू असल्याने त्यापुढे सुरक्षेने हात टेकले आहेत. येथील व्यवसाय पाहता या भागाचेे शिवनगर नाव बदलण्यात यावे, अशी वेळोवेळी मागणी झाली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत गेले.

Back to top button