राळेगणला तीन घरफोड्या; मारहाणीत महिला जखमी | पुढारी

राळेगणला तीन घरफोड्या; मारहाणीत महिला जखमी

जवळा : पुढारी वृत्तसेवा : पारनेर तालुक्यातील राळेगण थेरपाळ येथे एकाच रात्रीत तीन ठिकाणी घरफोड्या झाल्या. घावटे वस्तीवरील शहाजी जयराम घावटे यांच्या वृद्ध आई-वडिलांना मारहाण करून चोरट्यांनी आईच्या गळ्यातील दीड तोळ्याचे सोने, रोख रक्कम दोन हजार रुपये चोरून नेले. तसेच परिसरात राहणार्‍या मजुरांच्या कामाचे 4 हजार रूपये चोरट्यांनी लांबविले.  मंगळवारी रात्री घावटे कुटुंब झोपलेले असताना रात्री एक ते दोनच्या सुमारास चोरट्यांनी खोल्यांना बाहेरून कड्या लावल्या.

लहानूबाई घावटे याच्या डोक्यात काठीने मारून त्यांच्या गळ्यातील दीड तोळा व कानातील अर्धा तोळा सोन्याचे दागिने ओरबाडून काढून घेतले. आईच्या ओरडण्याने घरातील सर्वजण जागे झाले. परंतु, बाहेरून चोरट्यांनी कडी लावलेली असल्याने त्यांना बाहेर येता आले नाही. फोन करून शेजार्‍यांना उठविल्याने चोरट्यांनी पळ काढला. घटनास्थळी डीवायएसपी कातोडकर, पोलिस निरीक्षक घनश्याम बळी यांनी भेट देऊन पाहणी केली. श्वान पथकाने घरापासून ते मुख्य रस्त्यापर्यंत माग दाखविला. घटनास्थळी फिंगरप्रिंटस् घेण्यात आल्याची माहिती उपनिरीक्षक हनुमंत उगले यांनी दिली. पुढील तपास पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Back to top button