नगरपंचायत की, जिल्हा परिषद? पहिली निवडणूक ठरेल रंगीत तालीम; नेवाशामध्ये नेत्यांसह कार्यकर्ते, मतदारांत संभ्रम

नगरपंचायत की, जिल्हा परिषद? पहिली निवडणूक ठरेल रंगीत तालीम; नेवाशामध्ये नेत्यांसह कार्यकर्ते, मतदारांत संभ्रम
Published on
Updated on

कैलास शिंदे

नेवासा : अगोदर नगरपंचायत की, जिल्हा परिषद नेवासकरांना असा प्रश्न पडला आहे. जनतेसह नेतेही संभ्रमात असून, नेवाशात कोणती निवडणूक आधी होते? नगरपंचायत की, जिल्हा परिषद? असा संभ्रम आहे. नगरपंचायतीसाठी हालचाली सुरू झाल्या असून, नगरपंचायत झाल्यास ती निवडणूक आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांची रंगीत तालीम ठरणार आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी शासन पातळीवर हालचाली होत आहेत. आरक्षणाचा कार्यक्रमही जाहीर झाला होता. पुन्हा तो बारगळला गेला. नगरपंचायतीच्या हालचाली होत असतानाच जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठीही प्रशासकीय यंत्रणेकडून गती मिळत असल्याची चर्चा आहे. आरक्षण पुन्हा निघण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती गट व गणांमध्ये फेरबदल होण्याची चर्चा आहे किंवा जैसे थे राहण्याची शक्यता आहे.

नेवासा तालुक्यात जिल्हा परिषदेचे 8 गट व पंचायत समितीचे 16 गण आहेत. नगरपंचायत किंवा जिल्हा परिषद; कोणाची निवडणूक आधी होणार, याचे आकर्षण जनतेला आहे. कोणतीही निवडणूक असो नेवासा शहर व परिसरावर त्या निवडणुकीचे भवितव्य असते. नेवाशात विचित्र परिस्थिती आहे. कोणी कोणाचा भरवसा देऊ शकत नाही. ऐनवेळी गटतट, सवतेसुभे उभे राहिलेले अनेकवेळा पहायला मिळाले आहेत. कार्यकर्ते एका बाजूला, तर जनता एका बाजूला, असे चित्र अनेकवेळा झालेले आहे आणि ही वस्तुस्थिती आहे. सध्या नेवाशात नगरपंचायत व जिल्हा परिषद निवडणुकांचे वारे वाहत आहे. दोन्ही निवडणुका एकत्र झाल्या, तर काय होईल, या विषयी जनतेत तर्क-वितर्क लढविले जात आहेत. शक्यतो जिल्हा परिषद डिसेंबरनंतर होण्याकडे कल असल्याने नेवासा नगरपंचायत घोषणा होऊन निवडणूक दिवाळीच्या धामधुमीत होण्याची शक्यता आहे.

नेवाशात निवडणुकीसाठी उघडपणे कोणीही बोलत नाही. बैठका मात्र होत आहेत. नगरपंचायतीच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर हालचालींना वेग येणार आहे. नेवाशात कोण कोणाच्या आडून राजकारण करत आहे, हेच अनेकांच्या लक्षात येत नसल्याने काही जण तोंडघशी पडल्याची चर्चा होत आहे. शहरात अनेक गट-तट आहेत, तरीही काहींचा सवतासुभा राहतो. हे अनेकवेळा पहावयास मिळालेले आहे. मध्यंतरी नगरपंचायतीच्या निवडणुकीची घोषणा होऊन आरक्षणाने अनेकांच्या स्वप्नांवर विरजण पडले होते. आता पुन्हा प्रभाग रचना होणार का? आरक्षण कसे पडते? कोणाला संधी मिळते आणि कोणता प्रभाग राखीव होतो, याकडेही सर्वांचे लक्ष आहे. नेवाशात नगरपंचायतीच्या निवडणुकीकडे, तर तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. असे चित्र सध्या तरी नेवासा तालुक्यात आहे. नेवासा नगरपंचायतीची निवडणूक अगोदर झाल्यास, ती जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी रंगीत तालीम ठरणार आहे.

इच्छुकांचे ताबूत तूर्तास थंड!

मध्यंतरी नेवासा नगरपंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली होती. इच्छुकांच्या हालचाली गतिमान झाल्या होत्या. बैठका, जेवणावळी होत होत्या. परंतु निवडणूक लांबल्याने इच्छुकांचे ताबूत तूर्तास थंड झाले आहेत.

निवडणूक लांबल्याने काहींना आनंद!

नेवासा नगरपंचायतीची निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊनही निवडणूक श्रावणामध्येच होणार होती. काहींचा हिरमोड झाला होता. परंतु निवडणूक लांबल्याने इच्छुकांच्या काही कार्यकर्त्यांना मात्र आनंद झाल्याची चर्चा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news