पारनेर तालुक्यात ‘लम्पी’चा प्रादुर्भाव, पशु वैद्यकीय, संवर्धन अधिकारी सतर्क; जनावरांची काळजी घ्यावी | पुढारी

पारनेर तालुक्यात ‘लम्पी’चा प्रादुर्भाव, पशु वैद्यकीय, संवर्धन अधिकारी सतर्क; जनावरांची काळजी घ्यावी

पारनेर : पुढारी वृत्तसेवा : पारनेर तालुक्यात लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव जनावरांमध्ये आढळून येत आहे. पाच जनावरांना बाधा झाली असून, तालुक्यातील पशुवैद्यकीय अधिकारी या रोगापासून जनावरांचा बचाव व्हावा, यासाठी युद्धपातळीवर कामाला लागले आहेत. साडेतीन हजारांहून अधिक जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. लम्पी स्किन या संसर्गजन्य आजाराने तालुक्यात शिरकाव केल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण आहे. तालुका पशूवैद्यकीय अधिकार्‍यांनी गावा-गावात जनावरांमधील लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव आणि प्रसार रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना व जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.

पशुसंवर्धन विभागाने तपासणी करून नमुने पाठवले असता 5 जनावरे बाधित असल्याचे आढळले आहे. या संसर्गजन्य आजाराने थैमान घालण्यापूर्वीच पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. प्रादुर्भावग्रस्त गावांमध्ये बॅनर, दृकश्राव्य माध्यमांतून रोगाबाबत जनजागृती तसेच शेतकरी मेळाव्याचे आयोजन, रोगाचा प्रसार बाह्य कीटकंद्वारे (डास, माश्या, गोचिड) होत असल्याने आजारी नसलेल्या सर्व जनावरांवर तसेच गोठ्यात बाह्य कीटकांच्या निर्मूलनासाठी औषधांची फवारणी करावी, यासाठी ग्रामपंचायतीचा सहभाग घेण्यात यावा. बाधित परिसरात स्वच्छता तसेच निर्जंतुक द्रावणाची फवारणी करावी, नजिकच्या पशूवैद्यकीय दवाखान्यात कळवावे, अशा आशयाची परिपत्रके प्रत्येक गावात देण्यात आली आहेत.

रोगाचा प्रसार माशा, डास, गोचिड, बाधित जनावरे, दूषित चारा व पाण्यामुळे होतो. जनावरांच्या अंगावर दहा ते पन्नास मि. मी. व्यासाच्या गाठी येतात. सुरुवातीस खूप ताप येतो. डोळे, नाकातून चिकट स्राव बाहेर पडतो. जनावरे चारा-पाण्याकडे दुर्लक्ष करुन दूध उत्पादन कमी होते. काही जनावरांना पायावर सूज येते. गोठा स्वच्छ ठेवावा. गोठ्यामध्ये बाहेरील व्यक्ती जाताना निर्जंतुकीकरण करावे. हा साथीचा आजार जाईपर्यंत जनावरे खरेदी-विक्री थांबवावी.
                                   -डॉ. अरविंद रेपाळे, सहायक आयुक्त, पशुसंवर्धन

हा आजार विषाणूजन्य आहे. पशूपालकांनी काळजी घ्यावी. बाधित जनावरे तत्काळ वेगळी करावी. गोठ्यामध्ये सोडियम हायपोक्लोराइड किंवा फिनेलची फवारणी करावी. जनावरांना आयव्हरमेकटींग इंजेक्शन दिल्यास कीटकांचे नियंत्रण होते. जनावरांना लम्पी स्कीनची लक्षणे आढळल्यास त्वरित तालुका पशुवैद्यकीय विभागाशी संपर्क साधावा.
                                     -डॉ. स्नेहलता गवारे, पशूधन विकास अधिकारी

रोगाचा प्रसार माशा, डास, गोचिड, बाधित जनावरे, दूषित चारा व पाण्यामुळे होतो. जनावरांच्या अंगावर दहा ते पन्नास मि. मी. व्यासाच्या गाठी येतात. सुरुवातीस खूप ताप येतो. डोळे, नाकातून चिकट स्राव बाहेर पडतो. जनावरे चारा-पाण्याकडे दुर्लक्ष करुन दूध उत्पादन कमी होते. काही जनावरांना पायावर सूज येते. गोठा स्वच्छ ठेवावा. गोठ्यामध्ये बाहेरील व्यक्ती जाताना निर्जंतुकीकरण करावे. हा साथीचा आजार जाईपर्यंत जनावरे खरेदी-विक्री थांबवावी.
                             -डॉ. अरविंद रेपाळे, सहायक आयुक्त, पशुसंवर्धन

Back to top button