अवघ्या दोन महिन्यांत उखडला रस्ता, वडाळी-श्रीगोंदा रस्त्याची दुरवस्था | पुढारी

अवघ्या दोन महिन्यांत उखडला रस्ता, वडाळी-श्रीगोंदा रस्त्याची दुरवस्था

श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा : श्रीगोंदा नगर परिषदेमार्फत वडाळी-श्रीगोंदा यातील काही भागाचे नवीन रस्त्याचे काम करण्यात आले. रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने हा रस्ता अवघ्या दोन महिन्यांत उखडला आहे. हा रस्ता नागरिकांच्या फायद्यासाठी केला की, कंत्राटदाराच्या, असा सवाल उपस्थित केला जात आहे. श्रीगोंदा वडाळी या रस्त्यावरील आयटीआय कॉलेज ते विशाल हॉटेलपर्यंतचा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करण्यात आला. विशेष रस्ता अनुदानातून सुमारे 62 लाख या रस्त्यासाठी मंजूर होते. पूर्वीच्या जुन्याच डांबरी रस्त्यावर कुठलेही रुंदीकरण न करता नवीन रस्ता बनविण्यात आला. मात्र, रस्ता अत्यंत निकृष्ट झाल्याचे समोर आले. तयार केलेला रस्ता अवघ्या दोन महिन्यांत जागोजागी उखडला आहे. आलेला निधी खर्च करण्यासाठी थातूरमातूर रस्ते तयार करून जनतेच्या पैशांची लूट केली जात आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

………….तरी इतका निकृष्ट
आयटीआय कॉलेज ते वडाळी रस्ता नगराध्यक्षा शुभांगी पोटे यांच्या प्रभागात जातो आणि हाच रस्ता निकृष्ट दर्जाचा होत असेल, तर शहरातील इतर रस्ते व कामांचा दर्जा कसा असेल?

पैसा कोणाच्या खिशात जातो?
सामाजिक कार्यकर्ते सतीश बोरुडे म्हणाले, केवळ ठेकेदार आणि संबंधित यंत्रणेच्या फायद्यासाठी निकृष्ट कामे केली जात आहेत. शासनाचा पैसा कामांवर खर्च न होता कोणाच्या खिशात जातो, हे शहरवासीयांनी शोधून काढायला हवे.

रस्ता पुन्हा करून देण्याच्या सूचना
मुख्याधिकारी मंगेश देवरे म्हणाले की, काम सुरू असताना वाहने गेल्याने रस्ता उखडला आहे. ज्या ठिकाणी रस्ता खराब झालाख तेथे नव्याने दुरुस्ती करून देण्याच्या सूचना ठेकेदाराला दिल्या आहेत.रस्ता दुरुस्त करून दिल्याशिवाय ठेकेदारास अंतिम बिल दिले जाणार नाही.

दक्षता व गुणनियंत्रण विभागाकडून पाहणी
सुमारे 62 लाख रुपये खर्च करून केलेला रस्ता अवघ्या दोन महिन्यांत उखडत असेल, तर त्या कामाचा दर्जा निकृष्टच म्हणावा लागेल. या कामासाठी वापरण्यात आलेले डांबर दर्जेदार होते का, डांबरामध्ये काळे ऑईल समाविष्ट केले नव्हते ना, याची दक्षता व गुणनियंत्रण विभागाकडून तपासणी करण्याची मागणी होत आहे.

Back to top button