स्वाईन फ्लू : आणखी चार मृत्यू, नगर, राहाता तालुक्यांतही शिरकाव | पुढारी

स्वाईन फ्लू : आणखी चार मृत्यू, नगर, राहाता तालुक्यांतही शिरकाव

नगर : पुढारी वृत्तसेवा : पारनेर, संगमनेेर पाठोपाठ कोपरगाव व नगर तालुक्यातील आणखी चौघांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला. जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील स्वाईन फ्लूचा शिरकाव झाला असून, रुग्णांची संख्या 23 वर पोहोचली आहे. कोपरगावातील दोघांचा, संगमनेर येथील एकाचा नाशिक येथे तर पारनेर, नगर तालुक्यांतील रुग्णांचा मृत्यू जिल्हा रुग्णालयात झाला. गेल्या दोन सव्वादोन वर्षांपासून कोरोनाने ठिय्या मांडला आहे. या संसर्गाने हजारो व्यक्तींचा जीव घेतला असून, लाखो जनतेला बेजार केलेले आहे. गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा प्रभाव संपल्यात जमा आहे. तो जात नाही तोच स्वाईन फ्लू हजर झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत स्वाईन्फ्लूचे 23 रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये संगमनेर तालुक्यातील 15 जणांचा समावेश आहे. या सर्व रुग्णांवर खासगी रुग्णालयांत उपचार करण्यात आले आहेत. यापैकी दोघांचा मृत्यू झालेला आहे.कोपरगाव तालुक्यात तीन रुग्ण आढळले होते. या सर्व रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी दोन मृत्यू नाशिक येथील खासगी रुग्णालयात झाले, तर तिसरा मृत्यू जिल्हा रुग्णालयात झाला आहे.

पारनेर तालुक्यामध्ये 3 रुग्ण आढळले असून, एकाचा नगर जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. दोन रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नगर तालुक्यात एक रुग्ण आढळला तसून, जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला आहे. राहाता तालुक्यात देखील एक रुग्ण आढळला असून,त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात या संसर्गाचा प्रसार अधिक होऊ नये यासाठी आरोग्य विभागाचे प्रयत्न सुरु आहेत. स्वाईन फ्लू रुग्ण शोधून काढण्यासाठी गावागावांतील सर्दी, पडसे व खोकला असणार्‍या व्यक्तींचे सर्व्हेक्षण केले जात आहे.

संशयित रुग्णांचे स्वॅब घेऊन पुण्याला तपासणीसाठी पाठविले जात आहे. तसेच आरोग्य सेवक, सेविका, पर्यवेक्षकवैद्यकीय अधिकारी यांना आपापल्या क्षेत्रीय भेटीत शाळा, आश्रमशाळा, वसतीगृह, मदरसे, अनाथालये तसेच गरेदरमाता यांच्याकडे विशेष लक्ष देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यातील संशयित रुग्णांचे स्वॅब घेऊन पुण्याला तपासणीसाठी पाठविले जात आहे. या संसर्गाचे गांभीर्य ओळखून आरोग्य विभागाने टॅमीफ्लू गोळा उपलब्ध केल्या असून, त्या सर्व प्राथमिक आरोग्य, केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयांत वाटप केल्या असल्याचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वसंत जमधडे यांनी सांगितले.

जिल्हाभरात सर्वेक्षण सुरु
जिल्ह्यात या स्वाईन फ्लू संसर्गाचा प्रसार अधिक होऊ नये, झाला तर तो आटोक्यात यावा, यासाठी आरोग्य विभागाचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. स्वाईन फ्लू रुग्णांचे निदान करण्यासाठी गावागावांतील सर्दी, पडसे व खोकला असणार्‍या व्यक्तींचे सर्व्हेक्षण केले जात आहे. संशयित रुग्णांचे स्वॅब घेऊन पुण्याला तपासणीसाठी पाठविले जात आहे.

सात दिवसांत जवळच्या व्यक्तीला बाधा
स्वाईन फ्लू रुग्ण आढळल्यानंतर सात दिवसांत संसर्ग जवळच्या व्यक्तीमध्ये संक्रमित होत आहे. त्यामुळे संक्रमित झालेल्या जवळच्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. खबरदारी म्हणून जिल्ह्यात विलगीकरण कक्ष स्थापन करण्याचे आदेश आरोग्य संचालकांनी जिल्हा आरोग्य विभागाला देण्यात आले आहेत.

Back to top button