
नगर : पुढारी वृत्तसेवा : ग्रामीण पाणीपुरवठा विभागात जलजीवन मिशन अंतर्गत ई-निविदेच्या कामात गैरप्रकार व हलगर्जीपणा इत्यादी गैरवर्तन केल्याप्रकरणी कनिष्ठ सहायक प्रीतम दीपक बल्लाळ यांच्यावर जिल्हा परिषद सीईओ आशिष येरेकर यांनी थेट निलंबनाची कारवाई केली आहे. या संदर्भात काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, जेऊर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे कनिष्ठ सहाय्यक प्रीतम बल्लाळ यांनी कामकाजात हलगर्जीपणा करून कामकाज प्रलंबित ठेवून कर्मचार्याचे वेतन वेळेवर अदा केले नाही.
त्यामुळेे कर्मचार्यांना अतिरिक्त व्याज सोसायटीचे भरावे लागले. ऑडिट करावयाचे अभिलेखे हरवल्याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवून कामात केलेला हलगर्जीपणा, वरिष्ठांच्या आदेशाची अवमानता करून कार्यालयीन शिस्तीचे उल्लंघन करणे, ग्रामीण पाणीपुरवठा येथील जलजीवन मिशन अंतर्गत ई-निविदेच्या कामात गैरप्रकार व हलगर्जीपणा इत्यादी गैरवर्तन करून महाराष्ट्र जिल्हा परिषदा, जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम 1967 मधील 3 चा भंग केलेला आहे.
त्यामुळे प्रीतम बल्लाळ यांना जिल्हा परिषद सेवेतून निलंबित करीत असल्याचे सीईओ येरेकर यांनी म्हटले आहे. दरम्यान, बल्लाळ हे जेऊर आरोग्य केंद्रात कनिष्ठ सहायक असताना त्यांची नियुक्ती मार्चपासून पाणीपुरवठा विभागात केलेली होती.
त्यामुळे या कारवाईने विशेषतः जलजीवनसह अन्य महत्त्वाच्या विभागातील प्रतिनियुक्तीवरील कर्मचार्यांमध्येही खळबळ उडाली आहे.