सैन्यातील अधिकाऱ्याचा खून करून फरार झालेला आरोपी तब्बल 35 वर्षांनी जेरबंद | पुढारी

सैन्यातील अधिकाऱ्याचा खून करून फरार झालेला आरोपी तब्बल 35 वर्षांनी जेरबंद

नगर : पुढारी वृत्तसेवा :  सैन्यातील अधिकार्‍याचा खून करुन फरार झालेल्या आरोपीला तब्बल 35 वर्षांनी स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. माजी नगरसेवक राजू अंबादास गंगेकर (रा. तवलेनगर, औरंगाबाद रोड, नगर) असे आरोपीचे नाव आहे. सैन्यात शिकाऊ अधिकारी असलेल्या विनोद रावत व त्यांच्या साथीदारांमध्ये 1988 साली किरकोळ कारणावरुन शहरातील तेलीखुंट भागातील हॉटेल जगदंबाचे मालक भगवान गंगेकर यांच्याशी वाद झाले होते.

यावेळी मध्यस्थी करण्यासाठी राजू गंगेकर आणि त्याचा भाऊ अनिल गंगेकर प्रयत्न करत होते. मात्र, रावत व त्यांच्या साथीदारांनी हल्ला केला. या हल्ल्यानंतर राजू गंगेकर याने रावत यांचा पाठलाग करून हातातील गुप्तीने त्यांना भोसकून जखमी केले होते. या हल्ल्यानंतर उपचारादरम्यान रावत यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालयाने गंगेकर बंधूंना निर्दोष मुक्त केले होते.

त्यानंतर औरंगाबाद खंडपीठाने अपिलात राजू गंगेकर याला पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. या सुनावणीविरुध्द आरोपी गंगेकरने सर्वोच्च न्यायालयात अपिल केले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला होता. तेव्हापासून गंगेकर फरार होता. गंगेकर हा त्याच्या तवलेनगर भागातल्या घरी येणार, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार राजेंद्र वाघ यांना मिळाली. त्यानुसार आरोपीच्या घराशेजारी वेशांतर करून सापळा रचण्यात आला. ही कारवाई सहायक निरीक्षक गणेश इंगळे, सहाय्यक फौजदार राजेंद्र वाघ, संजय खंडागळे आदींनी केली.

Back to top button