
संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : ड्रोन कॅमेर्याचा वापर करून शोध मोहीम राबवून जोर्वे पुलावरून नदीत वाहून गेलेला दुसराही मृतदेह पिकअप वाहून गेलेल्या ठिकाणापासून अवघ्या शंभर मीटर अंतरावर शोधण्यात प्रशासनाला अखेर यश आले. त्यामुळे आता प्रशासनाने खर्या अर्थाने सुटकेचा निःश्वास सोडला. नाशिकवरुन काचा घेऊन एक पिकअप वाहनचालक प्रकाश किसन सदावर्ते हे तालुक्यातील ओझर येथे आले होते. परत जाताना पिंपरणे-जोर्वे जवळ प्रवरा नदीवरील पुलावर पाण्याचा अंदाज न आल्याने कठडे तोडून त्यांची पिकअप पुरात वाहून गेली होती. यातील अमोल खंदारे यांनी कसेबसे आपला जीव वाचवून किनारा गाठला, मात्र चालका सह दोघेजण वाहून गेले होते. या वाहनाला व त्यातील दोघांना शोधण्यासाठी प्रशासनाने थेट मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधून ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाला (टीडीआरएफ) तसेच गोताखोरांनाही पाचारण करण्यात आले होते.
अखेर प्रशासनाला यात यश येऊन बुधवारी रात्री या पथकाने सदरचे वाहनासह त्यातील चालक प्रकाश किसन सदावर्ते यांचा मृतदेह शोधून काढला होता. मात्र सुभाष अनंदा खदारे हे मात्र बेपत्ता होते. ठाण्यावरून आलेल्या टीडीआरएफ च्या पथकाने माघारी न जाता पुन्हा आपली शोध मोहीम सुरु केली. त्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला. अखेर काल (शुक्रवारी) दुपारी ज्याठिकाणी ही दुर्घटना घडली त्या ठिकाणापासून अंदाजे शंभर मीटर अंतरावर नदीच्या किनार्यावरील झुडपात हा मृतदेह आढळला. ही दुर्घटना घडल्यापासून प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, पोलिस उपाधीक्षक राहुल मदने तहसीलदार अमोल निकम, पो. नि. पांडूरंग पवार यांच्यासह पोलिस व महसूल लक्ष ठेवून होते. आज अखेर दोन्ही मृतदेह आणि पिकप नदीच्या पुराच्या पाण्यातून शोधून काढण्यात प्रशासनाला यश आल्यामुळे प्रशासनाच्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे. तीन दिवसांपासून ही शोध मोहिम सुरू होती. ठाणे येथील पथकासमवेत प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलिस तसेच महसुलचे कर्मचारी या ठिकाणी ठाण मांडून होते.