संगमनेर : शिरोळे खूनप्रकरणी सहा जणांना कोठडी | पुढारी

संगमनेर : शिरोळे खूनप्रकरणी सहा जणांना कोठडी

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा :  संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील येठेवाडी येथील बाळू शिरोळे याच्या डोक्यात दगड घालून ठार मारून त्याचा मृतदेह प्रवरा नदीच्या पात्रात फेकून दिला. हा मृतदेह दाढ खुर्द शिवारात सापडल्यानंतर अखेर संगमनेर शहर पोलिसांनी आठ जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करीत अटक केली आहे. या सहा जणांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. याबाबत संगमनेर शहर पोलिसांनी सांगितले की, तालुक्याच्या पठार भागातील एका महिलेला बाळू शिरोळे यांनी पळवून नेले होते.

याचा राग मनात धरून आठ जणांनी त्या इसमाचा कायमचा काटा काढला होता. दरम्यान, या प्रकरणी तालुका पोलिसांनी आठ जणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून, त्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या. या घटनेतील इसमाचा मृतदेह दाढ येथे नदीपात्रात आढळून आल्याने खुनाचे वाढीव कलम लावण्यात आलेले आहे. या घटनेतील सहा जणांना या अगोदरच पोलिसांनी अटक केली आहे. त्या सहाही जणांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेनंतर तालुक्यातील पठार भागात एकच खळबळ उडाली होती.

Back to top button