संगमनेर : मैत्रीचा गैरफायदा घेत विवाहितेवर अत्याचार | पुढारी

संगमनेर : मैत्रीचा गैरफायदा घेत विवाहितेवर अत्याचार

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : शहरातील एका विवाहित महिलेच्या जवळच्या नातेवाईकानेच मैत्रीचा गैरफायदा उचलत तिच्यावर गेल्या दोन वर्षांपासून वेळोवेळी अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी कैलास बबन धाकतोडे (रा. फत्याबाद, ता. श्रीरामपूर) विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी सांगितले की, शहरात राहणारी महिला एका कापड दुकानात काम करून, कुटुंबाची गुजराण करते.

तिची कैलास धाकतोडे याच्याशी ओळख झाली. एके दिवशी त्याने तिला एका हॉटेलमध्ये नेऊन बळजबरीने अत्याचार केला. ही बाब कोणाला सांगितली, तर तुझी समाजात बदनामी करील, अशी धमकी दिली. दरम्यान, कैलास याने पीडित महिलेला वारंवार फोन करून त्रास देत तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रकार सुरू केला होता. यानंतर, पुन्हा कैलासने पीडितेला फोन करून, म्हणाला, ‘तू भेटायला आली नाही, तर झालेला प्रकार तुझ्या पतीस सांगेल,’असे धमकाविले. यानंतर तिला दुचाकीवरून हिवरगाव परिसरात नेले. तेथे शिवीगाळ करून मारहाण करीत, बळजबरीने अत्याचार केला. यानंतर पीडितेने पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी पीडितेच्या फिर्यादीवरून कैलास धाकतोडे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पो.उ.नि. निकिता महाले पुढील तपास करीत आहे.

Back to top button