नगर : केवायसी करा, अन्यथा अनुदान बंद : जिल्हाधिकारी डॉ. भोसले | पुढारी

नगर : केवायसी करा, अन्यथा अनुदान बंद : जिल्हाधिकारी डॉ. भोसले

नगर : पुढारी वृत्तसेवा: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकर्‍यांना ई – केवायसी प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे. अद्याप 2 लाख 52 हजार 758 शेतकर्‍यांनी केवायसी केलेली नाही. या शेतकर्‍यांनी 31 ऑगस्टपर्यंत केवायसी करून घ्यावी, अन्यथा बारावा हप्ता बँकेत जमा होणार नाही, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिला आहे. अल्पभूधारक शेतकर्‍यांना आर्थिक मदत उपलब्ध व्हावी, यासाठी केंद्र सरकारने 2019 पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. प्रत्येक पात्र शेतकर्‍याला वर्षाकाठी एकूण 6 हजार रुपये निधी दिला जात आहे.

प्रत्येक चार महिन्याला 2 हजार रुपयांचा हप्ता शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा केला जात आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील एकूण 6 लाख 51 हजार 37 शेतकर्‍यांना मिळत आहे. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या बँक खात्यात 12 अब्ज 51 कोटी रुपये जमा झाले आहेत. काही लाभार्थी शेतकर्‍यांचे बँक खात्यावरील असलेले नाव तसेच आधारकार्डवर असलेले नाव यामध्ये फरक आढळून येतो. त्यामुळे या योजनेचा हप्ता पात्र शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर जमा होताना काही अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे प्रत्येक लाभार्थी शेतकर्‍यास ई-केवायसी प्रामाणिकरण करणे बंधनकारक केले. आतापर्यंत 3 लाख 98 हजार 279 शेतकर्‍यांनी केवायसी केली असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी सांगितले.

केवायसी शंभर टक्के व्हावी, यासाठी केंद्र सरकारने 31 मार्च 2022 पर्यंत मुदत दिली होती. मात्र, या प्रक्रियेस शेतकर्‍यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे या प्रक्रियेस 31 मे, 31 जुलै व 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली होती, तरीही अद्याप 2 लाख 52 हजार 758 शेतकर्‍यांची ई-केवासी केलेली नाही. या लाभार्थ्यांना 31 ऑगस्ट 2022 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. या मुदतवाढीचा लाभ शेतकर्‍यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. या पत्रकार परिषदेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप, भूसुधार तहसीलदार सुनीता जर्‍हाड आदीसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

ई -केवायसी बाकी असलेले शेतकरी
नगर 18,124, नेवासा 21,581, श्रीगोंदा 21,205, पारनेर 24,630, पाथर्डी 15,503, शेवगाव 21,239, संगमनेर 27,805, अकोले 19, 868, श्रीरामपूर 9563, राहुरी 16,768, कर्जत 16,666, जामखेड 11,651, राहाता 12,797, कोपरगाव 15, 358.

Back to top button