दीड लाख मतदानकार्डांना ‘आधार’ | पुढारी

दीड लाख मतदानकार्डांना ‘आधार’

नगर : पुढारी वृत्तसेवा : बोगस मतदाराला आळा घालण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने प्रत्येक प्रत्येक मतदाराच्या मतदान ओळखपत्राला आधार कार्ड जोडण्याचा निर्धार केला. त्यानुसार जिल्हा निवडणूक यंत्रणेने गेल्या 19 दिवसांत जिल्ह्यातील 1 लाख 40 हजार 17 मतदान ओळखपत्रांना आधाराची जोडणी केली आहे. करण्यात आली आहे. दुर्गम आणि आदिवासी बहुल असलेल्या अकोले तालुक्यात सर्वाधिक 27 हजार 857 मतदारांनी आधार जोडणी केली आहे. प्रत्येक व्यक्तीची एक विशिष्ट ओळख असावी, यासाठी देशभरात आधार नोंदणी करण्यात आली. जिल्ह्यातील जवळपास सर्वच जनतेकडे आधार कार्ड उपलब्ध आहे.

प्रत्येक शासकीय योजनेसाठी आधार कार्ड बंधनकारक झाले आहे. मतदार यादी बिनचूक करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने देखील आता आधार कार्डचा आधार घेतला आहे. अनेक मतदार दोन ठिकाणी मतदान नोंदणी करतात. त्यामुळे दोन्ही ठिकाणी मतदानाचा अधिकार वापरतात. त्यातून बोगस मतदानाचे प्रकार वाढीस लागला आहे. मतदानाची बोगसगिरी संपविण्यासाठी आता आधारकार्डचा उपयोग आयोगाला होणार आहे. या प्रक्रियेमुळे मतदार यादीतील दुबार नावे ओळखणे सोपे होणार आहे.

भारत निवडणूक आयोगाने 1 ऑगस्टपासून मतदारांचे मतदार ओळखपत्र आधारकार्डशी लिंक करण्याची मोहीम हाती घेतली. जिल्ह्यात एकूण 35 लाख 28 हजार 542 मतदारसंख्या आहे. यामध्ये 18 लाख 35 हजार578 पुरुष तर 16 लाख 92 हजार 810 महिला, तर 154 इतर मतदारांचा समावेश आहे. त्यापैकी आतापर्यंत 1 लाख 40 हजार 17 मतदारांनी मतदान ओळखपत्राशी आधार जोडणी केली असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील यांनी सांगितले. आधार जोडणी ऐच्छिक असली, तरी मतदार यादी अधिक पारदर्शक व्हावी, यासाठी सर्वच मतदारांनी पुढाकार घेऊन आधार लिंक करून घ्यावे, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

मतदारसंघनिहाय आधारजोडणी
अकोले 27,857, संगमनेर 14,184, शिर्डी 15,544, कोपरगाव 5,147, श्रीरामपूर 23,603, नेवासा 3,949, शेवगाव-पाथर्डी 4,407, राहुरी 15,335, पारनेर 3,574, अहमदनगर शहर 4,183, श्रीगोंदा 7,158 कर्जत-जामखेड 15,076.

Back to top button