नगर : चौदा वर्षांखालील गोविंदा नकोत! | पुढारी

नगर : चौदा वर्षांखालील गोविंदा नकोत!

नगर : दहीहंडी उत्सव व वीर गोगादेव निशाण मिरवणुकीत नियमांचे पालन करावे. 14 वर्षांखालील गोविंदांना सहभागी करता येणार नाही. डॉल्बी व डीजेला परवानगी दिली जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश पोलिस प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. शहरात होणार्‍या दहीहंडी उत्सव व वीर गोगादेव निशाण मिरवणुकीसंदर्भात मंडळांच्या प्रतिनिधींची बैठक पोलिस प्रशासनाच्या वतीने घेण्यात आली. यावेळी विविध 18 मंडळे व संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

कोतवाली पोलिस ठाण्याचे निरीक्षक संपत शिंदे, तोफखाना पोलिस ठाण्याच्या निरीक्षक ज्योती गडकरी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. जास्तीत जास्त 18 फूट उंचीवर दहीहंडी बांधता येईल. त्यापेक्षा जास्त उंचीवर दहीहंडी बांधता येणार नाही. कार्यक्रमस्थळी रुग्णवाहिका व प्रथमोपचार सुविधा ठेवण्यात यावी. सर्व मंडळे व संघटनांनी रितसर परवानगी घ्यावी. नियमांचे पालन करावे, असे निर्देश यावेळी देण्यात आले.

Back to top button