सुपा परिसरातील विविध अपघातांत तिघांचा मृत्यू | पुढारी

सुपा परिसरातील विविध अपघातांत तिघांचा मृत्यू

पारनेर : पुढारी वृत्तसेवा : नगर-पुणे महामार्गावर वांघुडे शिवारात पुण्याकडून नगरच्या दिशेने येत असलेल्या ट्रकने रस्ताच्या कडेला उभे असलेल्या दोघांना चिरडले. त्यात दोघेही जागीच ठार झाले. दरम्यान, पवारवाडी घाटात एसटी बसची धडक बसून दुचाकीस्वार ठार झाला. दोन्ही अपघात सोमवारी दुपारी घडले. यशवंत रासकर (वय 70, रा. वाघुंडे बुद्रूक ता. पारनेर), दिनेश महेश दाणे (रा.भूषणनगर, केडगाव) व एका 70 वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतांमध्ये समावेश आहे.

सोमवारी दुपारी नगर-पुणे महामार्गावर पुण्याकडून अहमदनगरच्या दिशेने येत असलेल्या ट्रकला वांघुडे गावच्या शिवारात एका मोटार सायकलस्वाराने हुलकावणी दिली. मोटारसायकलस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रक चालकाने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या दोघांना चिरडले. त्यात यशवंत रासकर व एक अनोळखी व्यक्ती असे दोघेही जागीच ठार झाले. याबाबत सुभाष अर्जुन रासकर (वय 34, रा. वाघुंडे बुद्रूक, ता. पारनेर) यांच्या फिर्यादीवरून सुपा पोलिस ठाण्यात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला. पोलिस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांचे पथक त्याचा शोध घेत आहे.

दरम्यान, सोमवारी दुपारी नगर-पुणे रस्त्यावर पवारवाडी घाटात पहिल्या वळणावर नगरहून पुण्याच्या दिशेने जात असलेल्या शेवगाव-पुणे एसटी बसने दुचाकीस्वाराला पाठीमागून जोराची धडक दिली. दुचाकीस्वार रस्त्यावर पडल्याने जबर मार लागला. पोलिसांनी जखमीला तत्काळ खासगी रुग्णालयात नेले. मात्र, वैद्यकीय अधिकार्‍यांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केले. पोलिसांनी उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

Back to top button