नगर : नदीजोड प्रकल्प तालुक्यात राबवणार | पुढारी

नगर : नदीजोड प्रकल्प तालुक्यात राबवणार

पारनेर, पुढारी वृत्तसेवा : नदीजोड प्रकल्प राबविण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळ अंतर्गत निधी उपलब्ध करून हा प्रकल्प लवकरच राबविण्यात येईल. तसेच, पारनेर तालुका दुष्काळी असल्याने, जेथे गरज असेल त्या ठिकाणी नदीजोड प्रकल्प राबविण्यात येणार आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी केले.

वडगाव आमलीत क्षारयुक्त पाण्यामुळे महिलांना पिण्यासाठी दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागत होते. सरपंच व ग्रामस्थांनी दोन महिन्यांपूर्वी सुजित झावरे यांची भेट घेऊन हा प्रश्न सोडविण्याची मागणी केली होती. झावरे यांनी जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी निधी मंजूर केला. या प्रकल्पाचे त्यांच्या हस्ते लोकापर्ण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या प्रकल्पाला स्व. गुलाबराव डेरे व स्व.सुनील जाधव यांचे नाव देण्यात आले.

यावेळी वडगाव आमली रस्त्यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत खा.सुजय विखे यांच्याकडे पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन झावरे यांनी दिले. यावेळी पाण्याचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल ग्रामस्थांनी झावरे यांचा सत्कार केला. यावेळी सरपंच अमोल पवार, संभाजी पवार, संदीप जाधव, नवनाथ ढोणे, व्हा. चेअरमन बाळासाहेब शिंदे, गुलाब पवार, मारूती ढोणे, दत्तात्रय पवार, ग्रामसेवक भुजबळ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

सुजित झावरे झाले भावुक

स्व. सुनील जाधव व स्व. गुलाबराव डेरे यांची आठवण काढत सुजित झावरे भावूक झाले. गावातील विकासात या दोघांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या जाण्याने अत्यंत दुःख झाले आहे. त्यांचे कार्य कायम स्मरणात राहण्यासाठी जलशुध्दीकरण प्रकल्पाला त्यांचेे नाव देऊन झावरे यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

Back to top button