जामखेडच्या संविधान स्तंभ चौकात भव्य 100 फूट तिरंगा ध्वज | पुढारी

जामखेडच्या संविधान स्तंभ चौकात भव्य 100 फूट तिरंगा ध्वज

जामखेड पुढारी वृत्तसेवा: संपूर्ण देशभरात स्वातंत्र्याचे 75 वे अमृत महोत्सवी वर्ष अतिशय उत्साहात साजरे करण्यात आले. कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांनी अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून जामखेड शहरातील संविधान स्तंभ चौक येथे भव्य 100 फुट उंच (30 मीटरचा) तिरंगा ध्वज उभारला आहे. 15 ऑगस्ट रोजी मतदारसंघातील वीरमाता, शासकीय अधिकारी व आमदार रोहित पवार यांच्या हस्ते हा भव्य तिरंगा ध्वज फडकविण्यात आला. कर्जत-जामखेड मतदारसंघात विविध उपक्रमांच्या माध्यमातून आमदार रोहित पवार हे कायमच सकारात्मक वातावरण निर्मितीचे काम करत आले आहेत. यावेळीही त्यांनी याच उद्देशाने समता, बंधुता व एकात्मता उन्नत राखण्यासाठी भव्य 100 फुट उंच तिरंगा ध्वज जामखेड शहरात उभारला आहे. यासाठी त्यांनी गेल्या काही दिवसात वैयक्तिक पातळीवर पुढाकार घेतल्याचं पाहायला मिळालं. तसेच त्यांनी स्वतः नागरिकांना, विद्यार्थ्यांना व मतदारसंघांतील सर्वांनाच यंदाच्या वर्षी स्वातंत्र्य उत्सवाच्या कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले होते.

या सोहळ्यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते. शासकीय अधिकारी, कर्मचारी, पत्रकार बांधव व स्थानिक नागरिक व विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने या सोहळ्याला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. मतदारसंघातील अनेक विकास कामे तर आ. रोहित पवार यांच्या माध्यमातून मार्गी लागतच आहेत. शिवाय अशा प्रकारे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात नावीन्यपूर्ण उपक्रम मतदारसंघात राबवल्याने परिसरातील नागरिकांनीही याबाबत समाधान व्यक्त केले आहे. याशिवाय कायमच आपल्या अनोख्या कार्यशैलिमुळे चर्चेत असणारे आ.रोहित पवार आणखी एका आगळ्यावेगळ्या आणि अनोख्या उपक्रमामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी असल्याचं दिसून येत आहे. मतदारसंघात पहिल्यांदाच अशा प्रकारे एवढा उंच तिरंगा ध्वज आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून उभारण्यात आला आहे हे विशेष.

Back to top button