उजनी धरण ऑगस्टमध्येच ओव्हर फ्लो, लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांमध्ये समाधान | पुढारी

उजनी धरण ऑगस्टमध्येच ओव्हर फ्लो, लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांमध्ये समाधान

सिद्धटेक :  पुढारी वृत्तसेवा : तब्बल 123 टीएमसी क्षमता असलेले सोलापूर-पुणे जिल्ह्याच्या सीमेवर असलेले उजनी धरण शुक्रवारी (दि 12 ) 102 टक्के भरले असून, उजनी धरणाचे 41 पैकी 16 दरवाजे 62 सेंटीमीटरने उचलून 31 हजार 600 क्युसेकने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. त्यामुळे भीमा नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे. उजनीने शंभर टक्केचा पल्ला पार केल्यामुळे पुणे, नगर , सोलापूर जिल्हा लाभक्षेत्रातील शेतकरी, व्यापारी व साखर कारखानदार आनंदीत झाले आहेत.

सोलापूर, पुणे, नगर या जिल्ह्यांतील शेतकर्‍यांसाठी वरदायिनी असलेले उजनी धरण मागील वर्षी 5 ऑक्टोबर रोजी भरले. चालू वर्षी मात्र 12 ऑगस्ट रोजी शंभर टक्के भरले आहे. यावर्षी पुणे जिल्हा व भीमा खोर्‍यात पावसाने जून महिन्यात पाठ फिरविल्याने धरण पूर्ण क्षमतेने म्हणजे 111.27 टक्के भरेल का नाही, याची खात्री कमी वाटत होती. परंतु मागील आठ दिवसांपासून पुणे जिल्ह्यासह भीमा खोर्‍यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने उजनी धरण साखळीतील बहुतांशी धरणे 100 टक्के भरली आहेत.

वरील धरणांतून सोडलेला पाण्याचा विसर्ग 58365 क्युसेसने दौडमधून उजनी धरण साठ्यात मिसळत आहे. उजनी 100 टक्के पार झाले आणि खबरदारीचा उपाय म्हणून दि 11 रोजी दुपारी 5 हजार क्युसेकने पाणी धरणामधून नदीपात्रात सोडण्यात सुरूवात केली. त्यात टप्प्या टप्प्याने वाढ करून शुक्रवारी दुपारी चार वाजता 16 दरवाजे 62 सें.मी. ने उचलून 40 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग नदिपात्रात सोडण्यात आला आहे.

उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे यावर अलंबून असलेल्या शेतीचा, तसेच औद्योगिक वसाहती, साखर कारखाने, गाव पाणीपुरवठा योजना तसेच सोलापूर, उस्मानाबाद, शहरासह अनेक गावांचा पाणीप्रश्न मिटला आहे. धरणाची वाढवलेली पाणी साठवण क्षमता 123 टी एमसी असून सध्याचा पाणीसाठा 116 .89 टीएमसी झाला आहे. उपयुक्त पाणीसाठा 52.32टक्के झाला आहे. धरण 2018 मध्ये 27 ऑगस्टला, 2019 मध्ये 7 ऑगस्टला, तर 2020 मध्ये 31 ऑगस्टला , 2021 मध्ये 5 ऑक्टोबरला पूर्ण भरले होते.

उजनी धरणात दौंड येथून 58 हजार 365 क्युसेक, बंडगार्डन येथून 23 हजार 623 क्युसेक वेगाने पाणी येत आहे . उजनी धरणातून कालव्याद्वारा होणारा विसर्ग दोन हजार क्युसेत आहे. माढा-कंदर बोगद्यातून 800 क्युसेक विसर्ग होत आहे . उजनी धरणाची क्षमता 117 टीएमसीची असून जास्तीत जास्त 123टीएमसी पर्यंत पाणी साठवून ठेवता येते. त्यावेळी धरण 111 टक्के होते. यावेळी उपयुक्त पाणी साठा 52 टीएमसी झाला आहे धरण पातळी 100 टक्के झाली आहे.

पाणीवाटपाचे नियोजन करायला हवे
उजनी धरण शंभर टक्के भरले असले तरी त्याच्या वाटपाचे योग्य नियोजन झाले नाही, तर ते रिकामे ही होते . याचा अनुभव 2018 मध्ये आला होता. धरण शंभर टक्के भरूनही नियोजनाअभावी दौंड, कर्जत, इंदापूर येथील नदीपात्र तीन महिने कोरडे पडले होते. त्यामुळे शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते.अनेक गावे व शहरांचा पाणीपुरवठा ही अडचणीत आला होता. याचा विचार करता पाणी वाटपाचे आमदार रोहित पवार, आमदार प्रा. राम शिंदे यांनी लक्ष घालून योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.

Back to top button