राहुरी : ‘स्वाभिमानी’ थेट नुकसानग्रस्तांच्या बांधावर! | पुढारी

राहुरी : ‘स्वाभिमानी’ थेट नुकसानग्रस्तांच्या बांधावर!

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : राजकीय हव्यासापोटी लोकप्रतिनिधींनी शेतकर्‍यांकडे दुर्लक्ष केले आहे. अतिवृष्टीने शेतकर्‍यांचे जीवन उद्ध्वस्त केले. कारखान्यांनी एफआरपी थकविले. कांदा निर्यात धोरणाने दर खाली आणले. याप्रमाणे सर्वच क्षेत्रातून शेतकर्‍यांचे खच्चीकरण होत असल्याने शासनाने तत्काळ शेतकर्‍यांना मदतीचा हात न दिल्यास नगर जिल्ह्यात कोणत्याही लोकप्रतिनिधीला फिरकू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी दिला. अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी संवाद साधून शेतकर्‍यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष मोरे म्हणाले, राज्यामध्ये जो तो लोकप्रतिनिधी स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी धडपड करीत आहे.

परंतु, देशाला वाचविणारा शेतकरी मात्र उपाशी असताना गुवाहाटी, सूरत असा प्रवास करून रंगिले जीवन जगणार्‍या लोकप्रतिनिधींना केवळ आपल्या मंत्रीपदाची काळजी लागली आहे. कोणी ईडीने त्रस्त आहे, तर कोणी सीबीआयने, तर काहींना न्यायालयीन अडचणी असल्याचे सांगत राजकीय नेतेे इकडून तिकडून दंग झाले आहेत. परंतु, काळ्या आईची सेवा करीत देशाला अन्न धान्य पुरविणारा शेतकरी मात्र देशोधडीला लागल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. एकीकडे नैसर्गिक संकटे येत असताना दुसरीकडे केंद्राचे कृषी धोरण शेतकर्‍यांसाठी मारक ठरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन 2014 मध्ये सत्ता येताच 2022 पर्यंत शेतकर्‍यांच्या उत्पन्नात दुप्पट वाढ केल्याशिवाय राहणार नाही, अशी घोषणा केली होती, असे मोरे म्हणाले. यावेळी बाळासाहेब निमसे, सतीश निमसे, लताबाई मगर, अनिल निमसे, संजय करपे, भाऊसाहेब बोबडे, ज्ञानदेव मगर, दत्तू मगर, नागूभाऊ निमसे, अमोल निमसे उपस्थित होते.

 

Back to top button