पुणतांबेकरांचा पुन्हा उपोषणाचा इशारा | पुढारी

पुणतांबेकरांचा पुन्हा उपोषणाचा इशारा

पुणतांबा : पुढारी वृत्तसेवा : येथील गोदावरी नदीवरील वसंत बंधार्‍याचे सुमारे 275 दरवाजे चोरीला गेल्यामुळे यंदा बंधार्‍यात पाणी अडणार की नाही, असा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, या चोरीचा तातडीने तपास करण्याच्या मागणीसाठी 15 ऑगस्टपासून लाभधारक शेतकरी राहाता पोलिस ठाण्यासमोर उपोषणाला बसणार असल्याचे सरपंच डॉ. धनंजय धनवटे यांनी सांगितले.
सन 1984 मध्ये बांधलेल्या या बंधार्‍यांची 231 दशलक्ष घनफूट पाणी क्षमता आहे.

यामुळे परिसरातील 2500 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते. बंधारा पुणतांबा व परिसराला वरदान ठरला आहे. या बंधार्‍यांची देखभाल गेल्या पंधरा वर्षांपासून लाभधारक शेतकरी करतात. त्यांना काही सूचना पाटबंधारे विभाग देते. या बंधार्‍यास एकूण 705 दरवाजे आहेत. दहा वर्षांपूर्वी काही दरवाजे कुचकामी झाल्यानंतर लाभधारक शेतकर्‍यांनी लोकवर्गणीतून 410 दरवाजे नवे बसविले. तर, माजी आ. स्नेहलता कोल्हे यांच्या प्रयत्नांतून 725 दरवाजे मिळाले. यानंतर बंधार्‍यात पूर्ण क्षमतेने पाणी अडविले जाऊन फेब्रुवारीपर्यंत पाणी साठा कायम असतो.

गेल्या दहा दिवसांपूर्वी बंधारा परिसरात 30 दरवाजे चोरीला गेल्याचे उघड होताच बंधारा कृती समितीचे अध्यक्ष सुधाकर जाधव यांनी पोलिसांत फिर्याद दिली होती. हा तपास लागण्यापूर्वीच तब्बल 275 दरवाजे चोरीस गेल्याचे आज उघड झाले.

Back to top button