दहिगाव शिवारात दरोडा, दाम्पत्याला लोखंडी गजाने मारहाण | पुढारी

दहिगाव शिवारात दरोडा, दाम्पत्याला लोखंडी गजाने मारहाण

वाळकी : पुढारी वृत्तसेवा : रात्रीच्या वेळी घरात घुसून शेतकरी पती-पत्नीला लोखंडी गजाने मारहाण करत दरोडेखोरांनी सोन्या-चांदीचे दागिने लुटून नेले. गुरूवारी (दि.11) पहाटेच्या सुमारास दहिगाव शिवारात ही घटना घडली. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात तिघांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. मंजाबापू मोहन जरे (रा.महाडूक मळा, दहिगाव शिवार, ता.नगर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. जरे हे शेतकरी असून वस्तीवर राहतात.

बुधवारी (दि. 10) रात्री जरे पती-पत्नी घरात झोपलेले असताना दरोडेखोर कडी-कोयंडा उचकटून घरात घुसले. जरे दांपत्यास लोखंडी गजाने बेदम मारहाण करत त्यांच्याकडील सोन्याचे मंगळसूत्र, कानातील फुले, बाळ्या, कुडके, पायातील चांदीचे जोडवे, पायातील चांदीच्या पट्ट्या, सोन्याचे मंगळसूत्र, असा ऐवज घेऊन पोबारा केला. या घटनेनंतर जरे दाम्पत्याने आरडाओरडा करत परिसरातील नागरिकांना मदतीसाठी आवाहन केले.

काही नागरिकांनी या घटनेबाबत नगर तालुका पोलिस ठाण्यात फोन करुन माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक राजेंद्र सानप पथकासह घटनास्थळी धावले. नगर शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक अनिल कातकडे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

Back to top button