नगर : घरकुल योजनांचे अनुदान वाढविण्याची आपची मागणी

नेवासा, पुढारी वृत्तसेवा : केंद्र व राज्य सरकारांच्या माध्यमातून ग्रामीण भागात राबविण्यात येणार्‍या घरकुल योजनांच्या अनुदानात वाढ करण्याची मागणी आम आदमी पार्टीचे नेवासा तालुका सचिव प्रवीण तिरोडकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

तिरोडकरांनी म्हटले की, केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गरजू कुटुंबांसाठी रमाई आवास, शबरी आवास, पारधी आवास, तसेच प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यात येतात. या सर्व योजनांतील लाभार्थ्यांना शासन प्रति घरकुल एक लाख 20 हजार अधिक रोजगार हमी योजनेतून 22 हजार लाभार्थ्याने पूर्वी शौचालय योजनेचा लाभ घेतलेला नसल्यास त्यासाठीचे 12 हजार, असे सरासरी एक लाख 42 हजार ते एक लाख 52 हजार इतके अनुदान देत असल्याकडे त्यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. त्याचबरोबर घरकुलासाठी स्वतःची जागा नसणार्‍या लाभार्थ्यांना खासगी जागा विकत घेण्यासाठीही 50 हजार ते एक लाखपर्यंत अनुदान देत असल्याचे त्यांनी यात नमूद केले आहे.

वाढत्या महागाईमुळे शासनाकडून मिळणारी रक्कम तुटपुंजी ठरत असल्याने या योजनांतील लाभार्थ्यांच्या घरकुलांची बांधकामे अर्धवट अवस्थेत आहेत. याचे प्रमाणही वाढले आहे. गेल्या काही वर्षांत यासाठी शासनाचे हजारो कोटी रुपये खर्च होऊनही असंख्य कुटुंबे कच्च्या निवासस्थानात असुरक्षितरित्या वास्तव्य करत असल्याचे विरोधाभासात्मक चित्र आहे. त्यामुळे घरकुलांचे अनुदान वाढवावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

‘अनुदान किमान दोन लाख करा’

ग्रामीण भागातील जागांच्या वाढत्या किंमती लक्षात घेऊन घरकुलासाठी जागा खरेदीचे अनुदान किमान दोन लाख करून घरकुल बांधकामासाठीचे अनुदान तीन लाख रुपये करण्याचा धोरणात्मक निर्णय व्यापक जनहिताच्या दृष्टीकोनातून घ्यावा.

Exit mobile version