नगर : रोहित पवारांनी घेतली निवडणूक आयुक्तांची भेट | पुढारी

नगर : रोहित पवारांनी घेतली निवडणूक आयुक्तांची भेट

कर्जत / जामखेड, पुढारी वृत्तसेवा : आमदार रोहित पवार यांनी नुकतीच राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची भेट घेतली. कर्जत व जामखेड तालुक्यांतील हक्काच्या असलेल्या दोन जिल्हा परिषदेच्या जागा मिळाव्यात, यासाठी त्यांनी आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याशी याबाबत चर्चा केली.

राज्यात सन 2019-2021 पर्यंत ग्रामीण लोकसंख्या सातत्याने वाढली असल्याचे दिसून आले. परंतु, अधिनियमात लघुत्तम व महत्तम मर्यादा निश्चित असल्याने वाढीव लोकसंख्येसाठी प्रतिनिधित्व योग्य प्रमाणात निश्चित होत नसल्याने या अधिनियमांमध्ये सुधारणा करून महाविकास आघाडी सरकारने प्रतिनिधींची संख्या वाढवण्याला मंजुरी दिली होती. त्यानुसार कमीत कमी 55 व जास्तीत जास्त 85 अशी संख्या वाढवली होती. परंतु सध्या राज्यात नव्याने सत्तेत आलेल्या सरकारने पुन्हा पूर्वीप्रमाणे कमीत कमी 50 व जास्तीत जास्त 75 संख्या करण्याचे आदेश काढले.

नगर जामखेडला बसतोय फटका

नगर जिल्ह्यासाठी 2012 च्या निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य संख्या 75 होती. त्यानंतर 2017 मध्ये ती संख्या कमी करून 73 करण्यात आली. परंतु महाविकास आघाडीने ज्यावेळी अधिनियमात बदल केला त्यावेळी नगर जिल्ह्यातील कर्जत व जामखेड तालुक्यातील प्रत्येकी एक अशा 2 जागा समाविष्ट केल्यानंतर नगर जिल्हा परिषद सदस्यांची संख्या ही 75 होती. 2017 प्रमाणे सदस्य संख्या केली गेल्यास कर्जत व जामखेडमधील जिल्हा परिषद सदस्य संख्या कमी होत आहे.

परंतु, लोकसंख्येच्या प्रमाणात महत्तम व लघुत्तम निर्देशांकानुसार योग्य प्रमाणात प्रतिनिधी मिळून कर्जत व जामखेडमध्ये प्रत्येकी एक जिल्हा परिषद गट वाढणे आवश्यक आहे. यासाठी दोन तालुक्यांच्या सदस्य संख्येत प्रत्येकी एकने वाढ केल्यानंतरही कोणत्याही नियमांचे व मर्यादेचे उल्लंघन होत नसल्याने संबंधितांना याबाबत आदेश देऊन सहकार्य करावे, अशी विनंती आमदार पवार यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

लोकांच्या हितासाठी लोकसंख्येनुसार प्रतिनिधित्व मिळणं गरजेचं असतं. त्यामुळेच निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची भेट घेऊन या संबंधी चर्चा करून विनंती केल्याचे आमदार पवार यांनी म्हटले आहे. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारने घेतलेला निर्णय नवीन सरकारने फिरविल्याने इच्छुक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर आमदार पवार यांनी निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन हक्काच्या गट संख्येबाबत चर्चा करून कार्यकर्त्यांच्या नाराजीची दखल घेतली. दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारने जिल्हा परिषदेचे गट कमी केल्याने इच्छुक कार्यकर्ते नाराज झाले आहेत. ही नाराजी लक्षात घेऊन पवार यांनी निवडणूक आयुक्तांची भेट घेतल्याचे सांगण्यात आले.

Back to top button