नगर : स्वस्त धान्यापासून दगडवाडी ग्रामस्थ वंचित | पुढारी

नगर : स्वस्त धान्यापासून दगडवाडी ग्रामस्थ वंचित

करंजी, पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी तालुक्यातील दगडवाडी येथील ग्रामस्थांना चार महिन्यांपासून स्वस्त धान्य मिळत नाही. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.

संबंधित यंत्रणेने तत्काळ दगडवाडीच्या ग्रामस्थांना स्वस्त धान्याचे वाटप करावे, अशी मागणी सरपंच स्वाती शिंदे, उपसरपंच निर्मला तनपुरे यांनी केली आहे. या संदर्भात सरपंच शिंदे म्हणाल्या की, दगडवाडी येथे दोनशे ते अडीचशे कुटुंब असून, या कुटुंबांना चार महिन्यांपासून स्वस्त धान्य वाटप करण्यात आले नाही. प्रत्येक महिन्याला काहीतरी कारण सांगून, या धान्यापासून लाभधारकांना वंचित ठेवले जात आहे. त्यामुळे ग्रामस्थ सरपंच व उपसरपंचांना दोषी ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत.

गेल्या चार महिन्यांपासून धान्य मिळत नसल्यामुळे ग्रामस्थ संतप्त असून तालुका पुरवठा विभागाने याची दखल घेऊन दगडवाडी येथील ग्राहकांना तत्काळ स्वस्त धान्याचे वाटप करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

दगडवाडी येथील ग्रामस्थांना कशामुळे स्वस्त धान्याचे वाटप करण्यात आले नाही.कारी तांत्रिक अडचण आहे काय, याबाबत चौकशी करून लवकरच वाटप करण्याचे संबंधितांना आदेश देऊ.

                                                        – ज्योती अकोलकर, तालुका पुरवठा अधिकारी.

Back to top button