नगर : कोपरगाव- वैजापूरचा संपर्क तुटल्याने संताप | पुढारी

नगर : कोपरगाव- वैजापूरचा संपर्क तुटल्याने संताप

शिरसगाव, पुढारी वृत्तसेवा : कोपरगाव तालुक्यातील शिरसगाव-तिळवणी या दोन गावांमध्ये असणार्‍या कोळनदीची पाणीपातळी वाढल्याने पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत 2 नळ्या टाकून पर्यायी मार्ग करण्यात आला. मात्र, अचानक नदीचे पाणी वाढल्याने पर्यायी रस्ता खचला आणि कोपरगाव- वैजापूर या दोन तालुक्यांचा संपर्क तुटला. पाण्याच्या जोराने रस्त्यावरील मुरूम वाहून गेल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भगदाड पडले आहे.

तीळवणी येथे कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची शिरसगाव-तीळवणी उपबाजार समिती आहे.सकाळी शेतकरी आपला शेतीमाल कांदा विक्रीस तीळवणी येथे आणतात. मात्र, रस्ता खचल्याने प्रवासाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिरसगावच्या शेतकर्‍यांनी गावातच मालवाहतूक साधने उभी केली, तर तीळवणीच्या शेतकर्‍यांनी बाजार समिती आवारात साधने उभी केली. आता उपबाजार समितीला दोन ठिकाणी दोनदा कांदा लिलाव करावा लागणार आहे. कारण चारचाकी वाहने पुढे जाऊ शकत नसून, फक्त दुचाकी गाड्या जातात. शिरसगाव- तिळवणी या दोन गावांच्या नागरिकांनी पुलाच्या ठेकेदाराकडे विचारणा केली असता, नेहमी उडवा- उडवीची उत्तरे मिळतात. काहीवेळा ग्रामस्थांना दमदाटी केली जाते.

पुलाचे काम उन्हाळ्यात करणे गरजेचे होते, परंतु सार्वजनिक बांधकामच्या ढिसाळ कारभारामुळे ग्रामस्थांसह प्रवाशांचे हाल होत आहेत.शेतकर्‍यांना शेतीमाल लिलावात नेता येईना, तर मुलांना शाळेत जाता येईना. याप्रश्नी ना. आशुतोष काळे यांनी लक्ष घालावे.

                                                            – जयश्री गायके, उपसरपंच, तिळवणी.

कोपरगाव तालुक्यातील शिरसगाव-तिळवणी येथे उपबाजार समिती असल्याने शेतकरी शेतीमाल व कांदा लिलावास आणतात, परंतु मंगळवारी पर्यायी रस्ता खचल्याने वाहतूक ठप्प झाली. यामुळे शेतकर्‍यांना बिकट परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.

                                                                  – राजेंद्र मोरे, व्यापारी, शिरसगाव.

Back to top button