नगर : जेऊरमधील वाड्या-वस्त्यांची वाट बिकट | पुढारी

नगर : जेऊरमधील वाड्या-वस्त्यांची वाट बिकट

नगर तालुका, पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील जेऊर परिसरातील अनेक वाड्या-वस्त्यांवरील रस्त्यांची दुर्दशा झाली असून, नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. रस्त्यांअभावी शेतकरी, दुग्ध व्यावसायिक, तसेच शालेय विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत आहेत.

जेऊर परिसरातील नाईक मळा रस्ता, चापेवाडी-शेटे वस्ती रस्ता, लिगाडे वस्ती ते खारोळी नदी रस्ता, तसेच अनेक वस्त्यांवर जाणार्‍या अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. वाहनेच काय पायी चालणे देखील अवघड बनले आहे. शेतकरी, दुग्ध व्यावसायिक व शालेय विद्यार्थ्यांचे हाल होत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. तरीदेखील रस्ते दुरुस्त केले जात नाहीत.

रस्त्याच्या समस्या अनेक दिवसांपासून भेडसावत आहेत. रस्त्याच्या समस्यांची दखल कोणाकडून घेण्यात येत नसल्याने नागरिकांमधून चीड व्यक्त करण्यात येत आहे. दुग्ध व्यावसायिकांना, तसेच शेतकर्‍यांना आपला शेतीमाल विक्रीसाठी बाजारात आणता येत नाही.
शाळेतील विद्यार्थ्यांना मोठी कसरत करीत शाळेत जावे लागत आहे. पावसामुळे सर्वत्र पाणी व चिखल झाला असून, वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांचे रस्त्याअभावी हाल सुरू आहेत. वाड्या-वस्त्यांवरील रस्ते तत्काळ दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, जेऊर परिसरात झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे सर्वच रस्त्यांची दुर्दशा झाली असून, चांगले रस्ते पुराच्या पाण्यामुळे उखडले आहेत.
त्यावरून मार्गक्रमण करताना ग्रामस्थांना कसरत करावी लागत आहे. पावसाळा संपताच या रस्त्यांची डागडुजी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

चापेवाडी-शेटेवाडी रस्ता चिखलात

चापेवाडी ते शेटे वस्ती रस्त्यावर संपूर्ण चिखल झाला असून, रस्त्यावरून पायी चालणे देखील अवघड बनले आहे. संबंधितांकडे वारंवार मागणी करून देखील रस्त्याचे काम होत नाही. शेतकरी, विद्यार्थी, दुग्ध व्यावसायिकांचे हाल सुरू आहेत. ते थांबविण्यासाठी संबंधितांनी पुढाकार घ्यावा, असे रमेश पवार यांनी सांगितले.

वादात अडकला रस्ता

न लिगाडे वस्ती ते लक्ष्मी माता मंदिर रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर करण्यात आला होता. त्यासाठी सुमारे एक कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. अर्धा रस्ता पूर्ण झाला. परंतु दोन शेतकर्‍यांच्या वादात रस्ता अपूर्ण आहे, तरी तो रस्ता पूर्ण करण्याची मागणी करण्यात येत आहे.

Back to top button