नगर : बाजार समिती आवारातले पाणी गाळ्यात घुसल्याने लाखोंचे नुकसान | पुढारी

नगर : बाजार समिती आवारातले पाणी गाळ्यात घुसल्याने लाखोंचे नुकसान

कोपरगाव, पुढारी वृत्तसेवा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हलगर्जीपणामुळे व आवारातील रस्ते उंच केल्याने काल पडलेल्या मुसळधार पावसाने सर्व पाणी हमाल मापाडी कार्यालय व मारुती मंदिर परिसरात जमा होऊन ते पाठीमागून गाळ्यात घुसल्याने गाळेधारकांची मोठे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भास्करराव सुरळे यांचे दुकानात पावसाचे पाणी पाठीमागच्या बाजूने शिरल्याने अतोनात नुकसान झाले. बाजार समिती आवारात रस्त्याचे बांधकाम उंच झाल्याने आवारातील पावसाचे सर्वपाणी पश्चिम बाजूस जमा होऊन तेथील तीन दुकाने सुरळे यांचे अंकुर कृषी सेवा केंद्र, सचिन पुटाफळे यांचे रविराज एजन्सी बाळासाहेब भंडारी यांचे किसान ऍग्रो टेक व गोडाऊनमध्ये शिरले. रस्ता बांधकाम केले, पण आवारातील पाणी बाहेर जाण्यासाठी पुरेशी नीट अशी व्यवस्था न केल्याने दुकानांमध्ये पाणी शिरुन माल भिजून हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. बाजार समिती प्रशासनाने याची गंभीर दखल घेवून आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करणे गरजेचे आहे, अशी मागणी येथील गाळेधारकांनी केली आहे.

ना. आशुतोष काळे यांच्याकडून चाैकशी

ना. आशुतोष काळे यांनी येथे येऊन नुकसानग्रस्त गाळेधारकांची चौकशी केली असून गाळेधारकांनी आम्हाला बाजार समितीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांच्याकडे केली आहे. शहर व परिसरात काल जवळपास चार इंचाच्या पुढे पाऊस पडल्याने मोठ्या प्रमाणावर सर्व ठिकाणी पाणी साठले गेले व चेंबर तुंबले गेल्याने हे पाणी बाहेर पडण्यासाठी जागा नसल्याने पाणी घुसून दुकानातील पेस्टिसाइड खते औषधे व इतर किमती वस्तू भिजून मोठे नुकसान झाले आहे. अंदाजे पावणे दोन लाख ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सुरळे म्हणाले.

रात्री बारा वाजेपर्यंत त्यांचे चिरंजीव अश्विन व इतर कामगार यांच्या मदतीने पाणी बाजूला काढून देण्यात व सामान हलवण्यात त्यांचा वेळ गेला. बाजार समिती आवारात असलेले हमाल मापाडी संघाचे कार्यालय पूर्णपणे पाण्यात होते गुडघाच्या वर त्याचे पाणी होते त्यामुळे तेथील कागदपत्रे व फर्निचर भिजून नुकसान झाले, अशी माहिती अध्यक्ष प्रकाश शेळके यांनी दिली. बाजार समितीच्या बाहेरच्या बाजूने गाळे असून तेथे प्रत्येकाच्या सोयीने आपापले ओटे बांधून घेतल्याने तेथील चेंबर लॉकअप झाले, त्यामुळे पाणी जाण्यास कुठलाही मार्ग नसल्याने मोठ्या प्रमाणात ते पाणी तेथेच तुंबले गेले त्यामुळे हे नुकसान झाल्याचे सुरळे यांनी सांगितले.

Back to top button