नगर: जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा; तिरंगा झेंडा लावण्यासाठी मालकी हक्काचे घरे देण्याची मागणी | पुढारी

नगर: जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा; तिरंगा झेंडा लावण्यासाठी मालकी हक्काचे घरे देण्याची मागणी

नगर: तिरंगा झेंडा लावण्यासाठी मालकी हक्काचे घर द्या या मागणीसाठी येथील कामगार संघटना महासंघ, सिटू, आयटक, ऑल इंडिया युथ फेडरेशन, अहमदनगर हॉकर्स संघटना, भिल्ल संघटना आणि अखिल भारतीय आदिवासी सभा यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चाचे नेतृत्व भाकपचे राज्य सहसचिव अ‍ॅड. सुभाष लांडे, सिटूचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. महेबूब सय्यद, किसान सभेचे अ‍ॅड. बन्सी सातपुत यांनी केले. हर घर तिरंगा, तिरंगे के लिए घर कहाँ, तिरंगा फडकवण्यासाठी घर द्या, इन्कलाब जिंदाबाद, लाल बावटे की जय, या घोषणांनी परिसर दुमदुमला होता. शहीद भगतसिंह स्मारक येथे भगतसिंह यांच्या पुतळ्यास रुक्मिणी सुभाष गोलवड, कांताबाई वसंत माळी, कलाबाई संजय गोलवड, अलका भाऊसाहेब गोलवड, अंजाबाई बर्डे, जयश्री अनिल माळी या आदिवासी महिलांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मोर्चाला प्रारंभ झाला.

हडको बसस्टॉप, मकासरे हेल्थ क्लब, तोफखाना पोलिस स्टेशन, प्रोफेसर कॉलनी चौक, गुलमोहोर रोड चौक, गुलमोहोर पोलिस चौकी मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चामधे अनेक आदिवासी महिला भगिनी बांधव, कामगार कष्टकरी, बेघर जनता तसेच भाडेकरी सहभागी झाले होते. यावेळी सुभाष लांडे, संजय झिंजे, प्रा. डॉ. महेबुब सय्यद यांची भाषणे झाली. जिल्ह्यातील महानगरपालिका हद्दीतील तसेच सर्व गावांतील, वाड्यावस्त्या व रानावनात राहणार्‍या आदिवासी, बेघर, भाडेकरी यांचा तातडीने सर्व्हे करून तिरंगा झेंडा लावण्यासाठी स्वत:च्या मालकीहक्काची घरे द्यावीत, या मागणीचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.

Back to top button