नगर : शिक्षणाची वाट बिकट..आमची ना पर्वा कोणाला | पुढारी

नगर : शिक्षणाची वाट बिकट..आमची ना पर्वा कोणाला

नगर तालुका, पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील जेऊर येथील रयत शिक्षण संस्थेच्या संतुकनाथ इंग्लिश विद्यालयात जाण्यासाठी असणारा पूल वाहून गेल्याने येथील विद्यार्थ्यांची परवड सुरू आहे.

संतुकनाथ इंग्लिश विद्यालयात इमामपूर, ससेवाडी, बहिरवाडी, धनगरवाडी, पांढरीपूल परिसरातून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत आहेत. सुमारे दिड हजार विद्यार्थी या विद्यालयात शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. मात्र, सीना नदीला आलेल्या पुरामुळे संतुकनाथ विद्यालयात जाणारा पुलच वाहून गेला आहे. पुल वाहून गेल्याने विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत आहेत. सीना नदीला पाणी वाहत असून, त्या पाण्यातून मार्ग काढत विद्यार्थ्यांची ये-जा सुरू आहे. अनेक दिवस उलटून गेले तरी पुलाचे काम करण्यात येत नसल्याने ग्रामस्थांमध्ये चीड निर्माण झाली आहे.

शासनातर्फे ग्रामीण परिसरातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी विविध योजना राबविल्या जातात. तालुक्यातील सर्वात मोठे गाव व संतुकनात विद्यालयात शिक्षणासाठी येणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय; पण पुला अभावी होणारे विद्यार्थ्यांचे हाल कोणाच्याही दृष्टीस पडत नाही, असे सांगितले जाते. ज्या पुलावरून विद्यार्थी ये-जा करतात त्या लगतच जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत नदीचे खोलीकरण करून मोठा चर खोदण्यात आली आहे. सीना नदीला वाहत असलेले पाण्यामुळे भविष्यात येथे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. विद्यार्थ्यांचे होणारे हाल पाहून ही अधिकारी पदाधिकारी गप्प का? असा सवाल ग्रामस्थांमधून उपस्थित केला जात आहे.

गेल्या वर्षी ही सीना नदीच्या महापुराने हा पूल वाहून गेला होता. त्यावेळी पुलाची दुरुस्ती तत्काळ करण्यात आली होती; परंतु सद्यची खूप बिकट परिस्थिती आहे. या बाबीकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. शालेय विद्यार्थ्यांची होत असलेली परवड थांबवण्यासाठी तत्काळ पुलाचे काम मार्गी लावण्याची मागणी जेऊर ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

…अन्यथा आंदोलन करणार

पुल वाहुन गेलेले अनेक दिवस उलटून ही पुलाचे काम करण्यात आले नाही. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत अधिकारी व पदाधिकार्‍यांना गांभीर्य नाही, ही मोठी खंत आहे. नेत्यांना निवडणुकांचे वेध लागले आहेत. विद्यार्थ्यांचे होत असलेले हाल कुणालाही दिसत नाही, ही शोकांतिका आहे. पुलाचे काम तत्काळ मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अविनाश तोडमल, शरद तोडमल, रविराज तोडमल, सुरज तोडमल, हर्षल तोडमल, माजी ग्रामपंचायत सदस्य विजय पाटोळे व ग्रामस्थांनी दिला.

शाळेत जाता येता पुल वाहून गेल्याने हाल होत आहेत. सीना नदीला पाणी वाहत आहे. पाण्यातून सायकल व दप्तर घेऊन जाताना मोठी कसरत करावी लागते. विद्यार्थी पाण्यात पडत आहेत. शेजारी खोल पाण्याचा खड्डा असल्याने जीवाला धोका आहे.

                                                          – जान्हवी पवार, विद्यार्थिनी, इयत्ता सातवी

शालेय विद्यार्थ्यांचे पुलाअभावी हाल होत आहेत. पुलाचे काम तत्काळ मार्गी लागण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांचे शिक्षण तसेच जीविताचा प्रश्न आहे. तरी अधिकारी व पदाधिकारी यांचे दुर्लक्ष होत आहे हे विशेष. तात्काळ पूल बनविण्याची गरज आहे.

                                              – अविनाश तोडमल, सामाजिक कार्यकर्ते, जेऊर

Back to top button