नगर : कोपरगावसह तालुक्याला पावसाने झोडपले | पुढारी

नगर : कोपरगावसह तालुक्याला पावसाने झोडपले

कोपरगाव, पुढारी वृत्तसेवा : पावसाने कोपरगाव शहरासह तालुका परिसराला अक्षरशः झोडपून काढले. सोमवारचा आठवडे बाजार आणि तीर्थक्षेत्र कोकमठाण येथे सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रमात पावसाने भाविकांची पळापळ केली. सोमवारी सायंकाळी सव्वापाच वाजेपासून पावसाला सुरुवात झाली. सलग दोन तास वादळी- वार्‍यासह पाऊस कोसळल्याने शहरातील गटारी तुडुंब भरून वाहत होत्या. रस्ते स्वच्छ धुऊन निघाले. अनेक प्रभागातील सखल भागात पावसाचे पाणी साचल्याने काही दुकानदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

पावसाने शेतकरी राजा सुखावला आहे. मुक्या जनावरांचे पावसाने अतोनात हाल झाले. तालुक्यात सर्वदूर पहिलाच पाऊस झाल्यामुळे शेतकर्‍यांना आता खरीप पिकांची चिंता राहिली नाही. बागायती पिकांनाही हा पाऊस पोषक आहे. जुन-जुलै दोन महिने उलटून गेले तरी पाऊस पडत नसल्याने विहिरींना पाणी उतरले नाही. आता या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.

सोमवारी आठवडे बाजार व राखी पौर्णिमा खरेदीसाठी ग्रामीण भागातून नागरिक शहरात दखल झाले होते. त्यांचे हाल झाले. भाजीपाला विक्रेत्यांना रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली. खंदक नाला ओसंडून वाहत होता. कोपरगाव बस स्टँड परिसरात जमा होणार्‍या पावसाच्या पाण्यामुळे मोपेड व रिक्षा वाहनांची प्रचंड अडचण झाली. काही भागात वीज प्रवाह खंडित झाला होता. काल (7 ऑगस्ट 2022) रोजी जिल्ह्यातील एका दिवसाचा सर्वाधिक 112.5 मिलीमीटर म्हणजे चार इंच बारा मिलिमीटर पाऊस ‘शिर्डी’त झाला. 1 जून ते आत्तापर्यंत शिर्डीत 303.5 मिलीमीटर पाऊस झाला. यापैकी कालच्या एका दिवसात 112.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. अ.नगर जिल्ह्यात 1 जूनपासून आतापर्यंत सरासरी 306.0 मिलीमीटर पाऊस झाला आहे. कालच्या एकाच दिवसात जिल्ह्यात सरासरी 19.1 मिलीमीटर पाऊस झाला.

कोपरगावात 64.5 मिलीमीटर पाऊस

काल एकाच दिवसात सर्वाधिक पाऊस कोपरगाव तालुक्यात सरासरी 64.5 मिलीमीटर झाला. याखालोखाल राहाता तालुक्यात सरासरी 47.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. 7 ऑगस्ट 2022 रोजी या एकाच दिवसात शिर्डी खालोखाल कोपरगाव तालुक्यात (98.8 मिलीमीटर), सुरेगांव (98.8 मिलीमीटर). सुरेगांव (98.8 मिलीमीटर), दहिगांव (51 मिलीमीटर), पोहेगाव (47.3 मिलीमीटर) तसेच राहाता तालुक्यात पुणतांबा (47.6 मिलीमीटर) व बाभळेश्वर (41.5 मिलीमीटर). संगमनेर तालुक्यात धांदरफळ (60.3 मिलीमीटर), राहूरी तालुक्यात सात्रळ (46.5 मिलीमीटर), ताहराबाद (37.5 मिलीमीटर), पाथर्डी तालुक्यातील टाकळी (46.0 मिलीमीटर) व पारनेर तालुक्यातील टाकळी (65.8 मिलीमीटर) पावसाची नोंद झाली आहे, अशी माहिती शिर्डी येथील माहिती अधिकारी सुरेश पाटील यांनी दिली.

Back to top button