नगर : मिरजगावमध्ये कडकडीत बंद | पुढारी

नगर : मिरजगावमध्ये कडकडीत बंद

मिरजगाव, पुढारी वृत्तसेवा : मिरजगाव ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी शरद कवडे यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ आजपासून (दि. 8) कर्जत तालुका ग्रामसेवक संघटनेने काम बंद आंदोलन पुकारले आहे. दरम्यान, काल रविवारी मिरजगावमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला.

ग्रामविकास अधिकारी कवडे ग्रामपंचायत कर्मचार्‍यांसह कर वसुलीसाठी फिरत असताना लक्ष्मी ऑइल मिलमध्ये थकीत कर भरण्याची नोटीस देण्याकरिता गेले असता, 5 ऑगस्ट रोजी 11.30 वाजता लक्ष्मी ऑईल मिल शेजारीच विनापरवाना दुसरा एक कारखाना चालू असल्याने त्याचे मोजमाप घेताना ग्रामविकास अधिकारी कवडे यांना कारखाना मालकासह त्यांच्या काही सहकार्‍यांनी बेदम मारहाण केली, तसेच शिवीगाळ करीत शासकीय कामात अडथळा आणला. याप्रकरणी मिरजगाव पोलिस ठाण्यात हल्लेखोरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कवडे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याच्या निषेधार्थ मिरजगाव बंदची हाक देण्यात आली होती. सर्व ग्रामस्थांनी बंदमध्ये सहभाग नोंदविला असून, या बंद दरम्यान मिरजगावचे सहायक पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ दिवटे व त्यांच्या सहकार्‍यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यामुळे गावात कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. या बंदला व्यावसायिक व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Back to top button